शिरापूर (सो) | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : दि. ५ मे २०२६ : घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वाळू मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात समोर आले आहे. राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेतला असतानाही, प्रत्यक्ष अंमलबजावणीत महसूल विभागाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर होत आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरकुल लाभार्थ्यांच्या हितासाठी निर्णय घेतला असला तरी सोलापूरमधील महसूल प्रशासन त्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, वाळू मोफत दिल्यास वाळू व्यवसायावर परिणाम होईल या भीतीने काही अधिकारी कठोर अटी लावून लाभार्थ्यांना वाळूपासून वंचित ठेवत आहेत. यामुळे शासनाच्या निर्णयालाच हरताळ फासला जात असल्याची टीका होत आहे.
दरम्यान, शिरापूर (सो) येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी तब्बल तीन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर ५ मे २०२६ रोजी तीन घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन ब्रास वाळू मिळवून दिली. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी तसेच तहसील स्तरावरील अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याची भूमिका घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!




0 Comments