सोलापूर, दि. १३ : उजनी धरणातून शिना नदी व सिंचन कॅनलमध्ये तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अन्यथा 20 जुलै 2026 रोजी उजनी धरणात उडी मारून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मोहोळ तालुक्यासह परिसरातील शेतकरी पावसाअभावी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने मोठ्या संकटात सापडले आहेत. उभी पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत उजनी धरणातून शिना नदी आणि कॅनलमध्ये तातडीने पाणी सोडणे ही काळाची गरज आहे.

अनिल पाटील यांनी आमदार, पालकमंत्री आणि खासदार यांना आवाहन करत तातडीची संयुक्त बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. "शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष निर्णय हवा," असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच मोहोळ तालुक्याचे आमदार यांच्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी गावोगावी दौरे करा. तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. लोकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आता शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची वेळ आली आहे," असे त्यांनी नमूद केले.

अनिल पाटील यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, 20 जुलै 2026 पर्यंत उजनी धरणातून शिना नदी व कॅनलला पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही, तर मी उजनी धरणात उडी मारून आंदोलन करणार आहे. पाणी सोडेपर्यंत माझे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी कोणत्याही त्यागाची तयारी आहे.