Advertisement

Breaking News
Loading...

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर...* *५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी; कडक पोलिस बंदोबस्तात १८ पथके तैनात...

 


दक्षिण सोलापूर: हॅलो रिपोर्टर न्यूज: प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासनाने सविस्तर कार्यक्रम जाहीर केला असून, १६ ते २१ जानेवारी या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार असल्याची माहिती दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


२२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी प्रक्रिया सुरू होणार असून छाननी पूर्ण होताच त्याच दिवशी वैध नामनिर्देशनांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

२३ ते २७ जानेवारी या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मात्र २५ जानेवारी (रविवार) व २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) असल्याने हे दोन दिवस वगळण्यात आले आहेत.


२७ जानेवारी रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.


निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी एसआरपी कॅम्प येथे पार पडणार आहे.


निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. स्थिर सर्वेक्षण पथके टाकळी सादपूर, बंकलगी, होटगी, भंडारदवटे, विजापूर नाका, पाणी टाकी आणि तांदूळवाडी येथे कार्यरत राहणार आहेत. यासोबतच पोलीस संरक्षणासह १२ भरारी पथके फिरती स्वरूपात तैनात करण्यात आली आहेत.


निवडणूक खर्च व आदर्श आचारसंहितेच्या पालनावर लक्ष ठेवण्यासाठी ४ व्हिडिओ सर्वेक्षण पथके कार्यरत असून, सभा, पदयात्रा व प्रचार कार्यक्रमांचे व्हिडिओ शूटिंग व पाहणी केली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी एकूण १८ पथके कार्यरत राहणार आहेत.


या निवडणुकीत एकूण २४७ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, ४,३७८ दुबार मतदारांबाबत मतदार परिशिष्ट ‘अ’ नुसार संबंधित मतदारांकडून हमीपत्र घेण्यात आले आहे. अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी हमीपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे.


अनामत रक्कम व फी बाबत तपशील पुढीलप्रमाणे आहे —

जिल्हा परिषद सर्वसाधारण- ₹ 1000

पंचायत समिती सर्वसाधारण- ₹ 700

जिल्हा परिषद एससी एसटी ओबीसी - ₹ 500

पंचायत समिती एससी एसटी ओबीसी - ₹ 350..

नामनिर्देशन अर्ज भरताना एकच सूचक ग्राह्य धरला जाणार असून, अनुमोदकाची आवश्यकता राहणार नाही, अशी माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत व नियमबद्ध पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments