Advertisement

Breaking News
Loading...

औज मंद्रुप येथील भिमा नदीपात्रातून वाळू चोरीचा प्रयत्न उधळला... ट्रॅक्टरसह ₹ ५.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त...

 

                                  प्रतिकात्मक चित्र

औज मंद्रुप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :– दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुप येथे भिमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल विभागाने कारवाई करत ट्रॅक्टरसह सुमारे ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ग्राम महसूल अधिकारी किरण दशरथ कोठुळे (औज मंद्रुप) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंडळ अधिकारी राणा वाघमारे, ग्राम महसूल अधिकारी गणेश भुजबळ, राजेश विठेकर तसेच कोतवाल भाऊ गायकवाड यांच्या पथकाने रात्री १ वाजण्याच्या सुमारास भिमा नदीच्या पात्रात छापा टाकला.

या कारवाईदरम्यान लाल रंगाचा अर्जुन महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. MH 45 F-1371) व पिवळ्या रंगाची ट्रॉलीमध्ये अंदाजे अर्धा ब्रास वाळू भरलेली आढळून आली. पथक पाहताच दोन इसम व चालक घटनास्थळावरून पळून गेले. नंतर आयाज जाफरसो पाटील (रा. औज मंद्रुप) हा ट्रॅक्टरचा मालक व चालक असल्याचे सांगत घटनास्थळी आला. त्याच्याकडे वाळू उपशाची कोणतीही रॉयल्टी पावती अथवा परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले.

सदर ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू असा एकूण अंदाजे ५,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मंद्रुप पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या प्रकरणी आयाज जाफरसो पाटील व दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच पर्यावरण कायदा कलम ९ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ बिराजदार हे करीत आहेत.



Post a Comment

0 Comments