रविवारचा चहा 🍵भाग- १९३
डाॅनला फोन लावतो..?
कोल्हापुरात बोर्डाच्या मिटिंग आटोपून विद्यापीठाच्या मधल्या रस्त्यानं मेन गेटमधून बाहेर पडत असताना आमच्या पुढे दोघे चालत होते. दोघे बोलत होते. एक म्हणाला, "अरे, पैसे संपलेत थांब डॉनला फोन लावतो." त्याचं बोलणं ऐकल्यावर कळलं, तो आपल्या बापाशी बोलत होता. बोलताना एकदम आज्ञाधारक. फोन ठेवल्यावर पुन्हा आपल्या मूळ लयीत आला. जो बाप आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय, त्या बापाविषयीच्या त्याच्या भावना पाहता उद्या अभ्यास करून तो मोठा झाला, तरी त्याच्या जीवनात बापाचं काय स्थान असणार आहे? बऱ्याचदा बाप घरी नसताना आईचं मुलं ऐकत नाहीत, त्या वेळी थांब तुझा बाप आल्यावर सांगते. हे आईचं आवडतं शस्त्र. लेकरांना धाक लावण्याची जबाबदारी बापावर येते. पण त्यामुळेच आपला बाप कोणीतरी खलनायक आहे, अशी लेकरांची भावना होते. ती जन्मभर टिकते.
कित्येक घरांत मुले बापाशी बोलत नाहीत. बापाच्याच पैशावर जगतात, पण ते पैसेही आईला मध्यस्थ घालून मागतात. तुमचा बाप तुमचा शत्रू नसतो. जरा नीट निरीक्षण करा. पोरगा नवीन आलेला आयफोन लगेच घेतो. बापाच्या हातात ५-७ वर्षांपासून एकच बटणांचा मोबाइल असतो. मुलगा ब्रॅण्डेड कंपनीचे बूट घालतो. बाप एकच प्लॅस्टिकची चप्पल वर्षभर ओढतो. कधीतरी बापाची चप्पल पायात घालून पाहा, तुमच्या नशिबाचे काटे बापाच्या पायाला टोचत असतात, हे लक्षात येईल. दिसला टी-शर्ट की मुलगा बिनधास्त विकत घेतो. कधीतरी बापाचा बनियन हातात घेऊन पाहा, मोजता येणार नाहीत इतकी भोकं त्याला असतात. तुम्ही फोटो काढण्यासाठी स्टायलिश गॉगल घेता. बापाच्या तुटलेल्या चष्म्याला एका बाजूला सुतळी बांधलेली असते.
लग्नात लेकीला हसत निरोप देणारा बाप रात्रभर उशी छातीशी कवटाळून रडत असतो. तुमच्या डीपीला कधीही बाप नसतो. बापाचा, डीपी, वॉलपेपर सगळीकडे मात्र तुम्हीच असता. सिनेमातल्या हिरोंसोबत सेल्फी घेणाऱ्याला कधी बापासोबत सेल्फी घ्यावासा वाटत नाही. कष्टाने रापलेल्या बापाची त्याला लाज वाटते. बापाचं रागावणं असो किंवा कौतुक करणं, त्याचा प्रत्येक श्वास तुमच्यासाठीच असतो. बाप हा तुमच्या जीवनदुर्गाचा असा बुरूज असतो, जो ढासळला, की तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरत नसतो. बाप लेकरासाठी आपलं सर्वस्व देतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
बाप उदार देवो अपरिमितु।
याचक स्वेच्छा सदोदितु।
असे सहस्रवरी देतु।
सर्वस्व आपुलें ॥
खरंच बाप समजून घेतला तर तो डाॅन वाटला तर अथांग पसरलेला महासागरातील दीपस्तंभ ठरेल. हे नक्की.
प्रा. दिलीप आनंदराव जाधव सांगली
सचिव
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.


0 Comments