सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: सोलापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली असून, पत्नी माहेरी गेल्यानंतर पुन्हा नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या चिमुकल्या मुलीसाठी भावनिक व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे.
प्रेम अंकुश जाधव (रा. तळे हिप्परगा, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वर्षभरापूर्वी त्याने प्रेमविवाह केला होता. संसार सुरळीत सुरू असतानाच दोन महिन्यांपूर्वी त्याला कन्यारत्न झाले. बाळंतपणासाठी पत्नी माहेरी गेली होती. मात्र, दोन महिने उलटूनही ती परत न आल्याने प्रेम मानसिक तणावाखाली होता.
होळी व शिमगा सणाच्या पार्श्वभूमीवर त्याने पत्नीला अनेकदा घरी परत येण्याची विनंती केली होती. परंतु तिने नकार दिल्याने तो अधिक खचला. रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवर व्हिडिओ शूट करत पत्नीला उद्देशून मुलीची काळजी घेण्याचा भावनिक संदेश दिला. तसेच ऑडिओ संदेश पाठवून आपली व्यथा मांडली असल्याचे समजते.
मध्यरात्री आवाज आल्याने दुसऱ्या खोलीत असलेल्या त्याच्या भावाने धाव घेतली असता प्रेम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणाची नोंद सिव्हिल रुग्णालय पोलीस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


0 Comments