Advertisement

Breaking News
Loading...

शिक्षणातील ध्रुवतारा आणि कुशल नेतृत्व सुरेश कांचन सर...

 


शिक्षणातील ध्रुवतारा आणि कुशल नेतृत्व सुरेश कांचन सर...

शिक्षण क्षेत्रात एखादी व्यक्ती जेव्हा तीस वर्षे सातत्याने ज्ञानदानाचे आणि प्रशासकीय कौशल्याचे कार्य करते, तेव्हा ती केवळ एक मुख्याध्यापक राहत नाही. तर ती संपूर्ण समाजासाठी एक संस्कार केंद्र बनते. सुरेश पांडुरंग कांचन सर हेच अशाच एका झंझावती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे. ज्यांचा आज सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न होत आहे.

30 वर्षाची अखंड ज्ञानसाधना केली. 27 जुलै 1996 रोजी सरांनी संत यादवबाबा माध्यमिक विद्यालय, शिंदवणे येथे आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून ते 31 मे 2026 पर्यंत तब्बल 3 दशके त्यांनी या विद्यालयाची धुरा अत्यंत निष्ठेने सांभाळली. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शाळा चालवणे आणि तिला यशाच्या शिखरावर नेणे हे कसब कांचन सरांनी लिलया पेलले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने केवळ शैक्षणिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेतली.

नेतृत्वाचा वटवृक्ष बनून तालुक्यापासून राज्यस्तरापर्यंत काम केले. शाळेच्या चार भिंतीपुरते मर्यादित राहिले नाही. त्यांच्याकडे असलेल्या विलक्षण संघटन कौशल्यामुळे त्यांनी विविध स्तरांवर महत्त्वाची पदे भूषवली. हवेली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून तालुक्याचे नेतृत्व केले. त्याचबरोबर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव आणि संपादक पद भूषवून जिल्ह्याला दिशा दिली. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता म्हणून राज्यस्तरावर शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्यांच्या या अफाट कार्याची दखल घेत त्यांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर आदर्श मुख्याध्यापक म्हणून गौरविण्यात आले आहे. 

सरांचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांची अभ्यासू वृत्ती आणि अत्यंत मनमिळावू स्वभाव. कर्मचाऱ्यांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि कठीण प्रसंगात घेतलेले अचूक निर्णय त्यामुळे ते हक्काचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. परोपकार वृत्ती आणि कोणतेही काम मनापासून करण्याची त्यांची धडपड नवीन पिढीतील शिक्षकांसाठी दीपस्तंभ आहे. 'आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक भेटतात पण काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या कार्याचा ठसा समाजावर कायमचा उमटतो.'

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे आधारस्तंभ आणि माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत सर यांचे अत्यंत विश्वासू व निष्ठावान सहकारी सुरेश कांचन सर.' हा क्षण पदावरून पायउतार होण्याचा नाही तर एका तपस्वी प्रवासाचा सन्मान करण्याचा आहे.

"पाऊलवाटेने चालताना ध्येयाचे भान ठेवावे, कष्टाच्या कामातूनच यशाचे नंदनवन फुलवावे." शिक्षण क्षेत्रातील झुंजार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. राजकारणात आणि समाजकारणात निष्ठा हा शब्द आजकाल दुर्मिळ होत चालला आहे. पण कांचन सरांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आमदार सावंत सरांच्या वर असलेली निष्ठा कधीच ढळू दिली नाही. शिक्षण क्षेत्रात काम करताना केवळ ज्ञानदान करून चालत नाही, तर ज्ञानाचे मंदिर असलेल्या शाळेचे आणि ते मंदिर सावरणाऱ्या शिक्षकांचे अस्तित्व टिकवणे महत्त्वाचे असते. कांचन सरांनी नेमके हेच ओळखले. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक कठीण प्रसंगात शिक्षकांचे नेतृत्व केले.

"माणुसकीच्या नात्याने जो प्रत्येकाशी जोडला गेला, तोच खऱ्या अर्थाने जन मनाचा राजा झाला."

आमदार सावंत सर आणि कांचन सर यांचे नाते हे केवळ कार्यकर्त्याचे राहिले नाही तर ते एका कुटुंबाचे भाग बनले. सावंत सरांच्या प्रत्येक मोहिमेत प्रत्येक निवडणुकीत आणि प्रत्येक कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. शिस्त आणि प्रेम यांचा अनोखा संगम त्यांच्यात पाहायला मिळतो. कामाचा व्याप कितीही असला तरी चेहऱ्यावरचे हसू आणि समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची वृत्ती त्यांनी कधीच सोडली नाही. 

"जगाच्या बाजारात नाती विकत मिळत नाहीत, ती कमावण्यासाठी कांचन सरांसारखी माणसं लागतात." 

नियत वयोमानानुसार ते निवृत्त होत असले तरी समाजकारणातून आणि लोकांच्या हृदयातून ते कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत. ज्याच्या रक्तातच कृती आहे अशा माणसाला विश्रांती कधी घेता येईल का? उलट आता त्यांच्याकडे संपूर्ण वेळ असेल पुन्हा नव्याने जोमाने सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेची गंगा प्रवाहित करण्यासाठी.

" कांचन सरांच्या कर्तृत्वाने शिंदवणेची भूमी पवित्र झाली ३०वर्षाच्या या तपश्चर्येने ज्ञानाचा वटवृक्ष बहरला. तुमच्या मार्गदर्शनाचा सुगंध, साऱ्या महाराष्ट्रात पसरला. 31 मे ची ती सायंकाळ, निवृत्तीचा हा क्षण कृतज्ञतेचा. ऋण फिटणार नाही कधी, या पवित्र ज्ञानयज्ञाचा."

कांचन सरांचा स्वभाव म्हणजे नारळासारखा,वरून कडक शिस्तीचे वाटले तरी आतून अत्यंत हळवे आणि मदतीला धावून जाणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. सामान्य कार्यकर्त्याला ही सन्मानाने वागवणे आणि मोठ्यांना आदर देणे ही त्यांची जमेची बाजू आहे. हे वय थकण्याचे नाही, तर आत्तापर्यंत मिळवलेल्या अनुभवाचे मोती समाजाला अर्पण करण्याचे आहे.

" सांजवेळ झाली तरी प्रकाश अजून बाकी आहे. प्रवासाची ही तर केवळ एक नवी झाकी आहे."  सुरेश कांचन सर आपण आपल्या आयुष्याची मौल्यवान वर्षे शिक्षण आणि समाजकार्यासाठी वेचली आहेत. आज आपल्या निवृत्तीच्या क्षणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि आमदार दत्तात्रय सावंत सरांचे सर्व कार्यकर्ते आपल्या ऋणात आहेत. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि भरभराट देवो. आपला सहवास आम्हाला यापुढेही मार्गदर्शक ठरो, हीच सदिच्छा!!

"कर्तुत्वाचा हिमालय तुम्ही सर केला, माणुसकीचा सुगंध सर्वत्र दरवळला."



       आपलाच,

 राजेंद्र महादेव आसबे.

सहशिक्षक:- साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तावशी.

संपर्कप्रमुख:- महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती पुणे जिल्हा.

जिल्हाध्यक्ष:- सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ, सोलापूर.

संचालक:- सोलापूर जिल्हा कृती समिती मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था, मर्यादित, पंढरपूर


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments