Advertisement

Breaking News
Loading...

रविवारचा चहा🍵 क्र.- २१० बाप: काळाच्या पडद्यामागचं एक अढळ अस्तित्व

 


रविवारचा चहा🍵 क्र.- २१०

बाप: काळाच्या पडद्यामागचं एक अढळ अस्तित्व


पितृदिन आला की मनात एक हलकीशी कालवाकालव होते. 'मदर्स डे' सारखा गाजावाजा नाही, व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटसचा पूर नाही, दुकानात गिफ्टचा ढीग नाही. बापाचं असंच असतं . तो गाजावाजा करत नाही. तो असतो, न सांगता, न दाखवता, फक्त असतो. वडाच्या झाडासारखा. सावली देतो, पण त्याबद्दल कधी बोलत नाही. 

लहानपणी बाप म्हणजे एक 'दहशत' होती. घराचं दार उघडलं की आधी नजर जायची . बाबांच्या चपला आहेत का? असल्या तर टीव्हीचा आवाज एकदम बारीक, अभ्यासाचं पुस्तक हातात. तो माणूस घरात असला की सगळं घर एका शिस्तीत चालायचं. त्याचं बोलणं कमी, रागवणं जास्त. प्रेम करायचा का तो? खूप करायचा. पण त्याचं प्रेम पावसासारखं नव्हतं जे दिसतं, भिजवतं. त्याचं प्रेम जमिनीतल्या पाण्यासारखं होतं . दिसत नाही, पण झाड जगतं त्याच्यावर. 

तो हात कधी डोक्यावरून फिरला नाही. "बाळा, जेवला का?" असं मायेने विचारलं नाही. पण रात्री 11 वाजता आपण अभ्यास करत बसलो तर हळूच टेबलावर येऊन दुधाचा ग्लास ठेवून जायचा. तो ग्लास म्हणजे त्याचं 'गुड नाईट' होतं. त्याची माया होती. 

काळ सरकला. आपण मोठे झालो. आणि बाप? तोही बदलला. किंवा काळाने त्याला बदलायला भाग पाडलं. 

आजचा बाप आरशात पाहतो तेव्हा त्याला दोन चेहरे दिसतात. एक त्यांच्या वडिलांचा  कडक, शिस्तप्रिय, शब्दाला मानणारा. ज्याने प्रेम केलं पण मिठीत कधी घेतलं नाही. आणि दुसरा चेहरा त्याच्या मुलाचा  ज्याला मिठी हवी आहे, संवाद हवा आहे, 'बाबा चुकलं माझं' म्हटल्यावर 'ठीक आहे' असं म्हणणारा माणूस हवा आहे. 

आणि या दोन चेहऱ्यांमध्ये आजचा बाप स्वतःला शोधतोय. तो सेतू होतोय. 

पूर्वीचा बाप 'आज्ञा' द्यायचा  "हे कर." आजचा बाप 'परवानगी' देतो  "करून बघ, आहे मी पाठीशी." या एका वाक्यात दोन पिढ्यांचं अंतर सामावलंय. पूर्वी बाप म्हणजे न्यायाधीश होता, निकाल देणारा. आज बाप वकील झालाय . आपल्या पोराची बाजू मांडणारा. 

किती बदललाय ना तो? 

पूर्वी पोर रडलं की बाप म्हणायचा, "मर्दासारखं रहा रडायचं नाही." आज तोच बाप पोराच्या डोळ्यात पाणी बघून म्हणतो, "रड बाळा, माणूस म्हणून रडणं गरजेचं असतं. मी आहे इथे." त्याने रडण्याला दुर्बळपणा नाही, तर माणूसपणाचा दर्जा दिला. ही क्रांती नाही का? 

आजची पोरं प्रेमभंग झाला की आईकडे जात नाहीत, बाबांकडे जातात. करिअरचं टेन्शन आलं की बाबांशी बोलतात. "बाबा, माझं चुकलं" हे सांगायची हिंमत आजच्या पिढीत आली आहे, कारण समोरून "माफ कर बेटा, माझीही चूक झाली असेल" असं ऐकायला मिळतं. 

चुकीची कबुली देणारा बाप .हा आमच्या पिढीने पाहिलेला पहिलाच पुरुष असेल. त्याने 'इगो' नावाच्या भिंतीला पहिला धक्का दिला. 

पण हे सगळं करताना त्याची घुसमट होत नाही का? होते. तो दोन टोकांमध्ये अडकलाय. त्याच्या वडिलांनी शिकवलेली मूल्यं आणि त्याच्या मुलांची अपेक्षा यात तो रोज स्वतःशीच लढतो. कधी वाटतं, जास्त मोकळं वागलो तर पोर डोक्यावर बसेल का? कधी वाटतं, जुन्या वळणाने गेलो तर दुरावा निर्माण होईल का? 

या द्वंद्वातूनच 'आधुनिक बाप' जन्माला आलाय. तो परफेक्ट नाही. तो चुकतो, धडपडतो, सावरतो. पण त्याची दिशा चुकत नाही. त्याला फक्त एकच हवंय - "माझं लेकरू सुखी राहो, आणि माझ्यापासून न लपवता मोकळेपणाने जगो."

आम्ही लहान होतो तेव्हा त्याचा राग यायचा. "काय सतत काम करता? कधी तरी खेळा की आमच्याशी." असं वाटायचं. आता कळतं, तो खेळत नव्हता कारण त्याला खेळायला वेळच नव्हता. पगाराची ती बारीकशी स्लिप हातात घेऊन तो आख्ख्या महिन्याचा ताळेबंद मांडत बसायचा.आजी-आजोबांचा दवाखाना ,मुलांची फी, बायकोचं औषध, घरभाडं, किराणा... या सगळ्यातून उरलंसुरलं काय तर स्वतःसाठी सहा महिन्यांनी एक शर्ट. 

तो शर्ट जुना झाला तरी त्याने तक्रार केली नाही. कारण त्याची तक्रार ऐकणारं कोणी नव्हतंच. बापाची जातच अशी .तो ऐकून घेतो, सांगत नाही. 

आज जेव्हा त्याची पोरं मोठी होऊन त्याला 'बेस्ट फ्रेंड' म्हणतात, तेव्हा त्याच्या आयुष्याचं सार्थक होतं. याहून मोठं अ‍ॅवॉर्ड कुठलं? 

पण ज्यांचे बाबा आज हयात नाहीत, त्यांचं काय? पितृदिन त्यांच्यासाठी फक्त एक वेदना घेऊन येतो. जुनं भांडण आठवतं, त्याचा रागवलेला चेहरा आठवतो, आणि काळजात चर्र होतं. वाटतं, "एकदा तरी ओरडा ना बाबा. तुमचं ते ओरडणंच ऐकायचंय. कारण आता कळलंय, त्या ओरडण्यातही काळजीच होती. तुम्ही सोडून कधी गेलाच नाहीत." 

ही पोकळी कशानेच भरत नाही. फक्त एक न सांगितलेला माफीनामा उरतो .त्याचाही, आपलाही. 

शेवटी बाप म्हणजे काय? 

बाप म्हणजे काळाच्या पटावरची एक अशी रेषा जी दिसत नाही, पण तिच्याशिवाय चित्र पूर्ण होत नाही. तो इंस्टावर फोटो टाकत नाही, रील करत नाही. त्याचं 'आय लव्ह यू' हे तीन शब्दात कधीच मावलं नाही. 

त्याचं 'आय लव्ह यू' म्हणजे पहिल्या पगारात आणलेला त्याच्यासाठीचा शर्ट. 

त्याचं 'आय लव्ह यू' म्हणजे रात्री उशिरा तुम्ही घरी येईपर्यंत जागणं. 

त्याचं 'आय लव्ह यू' म्हणजे डब्यातला शेवटचा घास तुमच्यासाठी ठेवणं. 

त्याचं 'आय लव्ह यू' म्हणजे पावसात भिजत तुमच्यासाठी आणलेला वडापाव. 

शब्द बदलले, काळ बदलला, बापाची रूपं बदलली. तो खंबीर होता, तो कोमल झाला. तो गप्प होता, तो बोलका झाला. तो शिस्त शिकवणारा होता, तो संवाद शिकवणारा झाला. 

पण त्याच्या काळजातलं तुमच्यासाठीचं स्थान? ते अढळ आहे. कालही, आजही, उद्याही. 

तो 'आधुनिक' झाला असेल, पण 'बाप' म्हणून तो अजूनही 'अद्वितीय'च आहे. 

कारण काही नाती व्याख्यांच्या पलीकडची असतात. बाप हे असंच एक नातं. ते समजून घ्यायचं नसतं, फक्त जगायचं असतं. आणि जपायचं असतं. 

ज्यांचे बाबा आहेत, त्यांनी आज जाऊन एकदा घट्ट मिठी मारा. काही बोलायची गरज नाही. फक्त मिठीत घ्या. कारण त्याने आयुष्यभर शब्दांपेक्षा कृतीतून प्रेम केलंय. आज कृतीची परतफेड कृतीनेच करा. 

आणि ज्यांचे नाहीत, त्यांनी आकाशाकडे बघून एकदा डोळे मिटा. तो तिथेच कुठेतरी असेल, तुमच्या प्रत्येक यशात टाळी वाजवताना. 


कारण बाप शेवटी बापच असतो. बाप बापही होता है. 


प्रा. दिलीप आनंदराव जाधव, सांगली.

               राज्य कोषाध्यक्ष

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.

           ‌‌        सचिव

सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,सांगली.

Post a Comment

0 Comments