शिरापूर (सो) | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) ते लोकमंगल हा रस्ता नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून, वारंवार निवेदने व आंदोलने करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप डिजिटल शेतकरी संघटना, शिरापूरचे संस्थापक अध्यक्ष अनिल अवाजी पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह खासदार प्राणिती शिंदे यांनाही निवेदन दिले आहे.
पत्रकारांशी बोलताना अनिल पाटील यांनी सांगितले की, या रस्त्यावरून दररोज 100 ते 150 शालेय विद्यार्थी, 200 ते 300 शेतकरी तसेच लोकमंगल संस्थेचे कर्मचारी व कामगार ये-जा करतात. रस्त्यावरील खड्डे आणि खराब अवस्थेमुळे वारंवार अपघात होत असून अनेक नागरिकांना उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागला आहे.
रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन स्वतःच्या खर्चातून दीड ते दोन लाख रुपयांचा मुरूम टाकल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
महिनाअखेरीपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास 1 जुलै 2026 पासून स्वतः रस्त्याचे काम हाती घेण्याचा इशारा अनिल पाटील यांनी दिला आहे. तसेच 3 जुलैपासून पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे आणि मोहोळचे आमदार राजू खरे यांचे फोटो गळ्यात घालून महाराष्ट्रभर "भीकमागो आंदोलन" छेडण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा निर्धार व्यक्त करत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.


0 Comments