सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दि. 17 जून : सोलापूर शहरातील 70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्स येथे पिस्टलचा धाक दाखवून दोन सोन्याचे नेकलेस लुटणाऱ्या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांत अटक केली आहे. आरोपींकडून चोरीतील सोन्याचे दागिने, देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतुसे, मोबाईल फोन आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
13 जून 2026 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तीन जणांनी अॅक्सेस दुचाकीवर येऊन शिवकुमार ज्वेलर्स दुकानात प्रवेश केला. त्यांनी दुकान मालकास पिस्टलचा धाक दाखवून दोन सोन्याचे नेकलेस जबरीने लुटले. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी चार विशेष तपास पथके तयार केली. तपासादरम्यान सुमारे 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
गुप्त बातमीदारामार्फत आरोपी अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिराजवळ चोरीचे सोन्याचे नेकलेस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून जिलानी मोहम्मद रफिक दामटे (वय 33) आणि साहिल उर्फ भाई नवी नंदियाल (वय 24) यांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान जिलानी दामटे याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, एक सोन्याचा नेकलेस व मोबाईल फोन जप्त करण्यात आला. तर साहिल नंदियाल याच्याकडून दुसरा सोन्याचा नेकलेस व मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला.
चौकशीत आरोपींनी कर्नाटकातील रेहान उर्फ जड्डया रमजान लडाफ उर्फ शेख या साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली अॅक्सेस दुचाकी कुर्डुवाडी येथून चोरी केल्याचेही उघड झाले आहे.
जप्त मुद्देमाल:
20 ग्रॅम सोन्याचा नेकलेस – ₹2,60,000
18 ग्रॅम सोन्याचा नेकलेस – ₹2,34,000
सुझुकी अॅक्सेस दुचाकी – ₹50,000
देशी बनावटीचे पिस्टल व 3 जिवंत काडतुसे – ₹56,000
विवो मोबाईल – ₹15,000
रेडमी मोबाईल – ₹15,000
एकूण जप्त मुद्देमाल : ₹6,30,000
आरोपींवर अनेक गुन्हे दाखल
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे व सोलापूर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी:
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे, निलेश पाटील-सोनवणे यांनी केली.
तपास पथकातील पोलीस अंमलदार : नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, जावेद जमादार, घिरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल यलमार, विनोद रजपूत, सिद्धाराम देशमुख, विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंखे, उमेश पवार, अभिजित धायगुडे, आबाजी सावळे, काशिनाथ वाघे, भारत पाटील, वसिम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंढे, राजकुमार पवार, शैलेश बुगड, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, वाजीद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, अभिजित पवार तसेच सायबर पोलीस स्टेशनचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे आणि फरदिन शेख यांनी सहभाग घेतला.


0 Comments