Advertisement

Breaking News
Loading...

शिरापूर (सो) येथे नदीकाठचा वीजपुरवठा खंडित; शेतकऱ्यांचे नुकसान — तात्पुरते आंदोलन स्थगित...

 

शिरापूर (सो), ता. मोहोळ प्रतिनिधी —

सीना नदीला आलेल्या महापुरामुळे मौजे शिरापूर (सो) येथील नदीकाठावरील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. महापुरामध्ये अनेक ठिकाणी वीज डी.पी. वाहून गेल्या असून पोल तुटलेले किंवा वाहून गेलेले आहेत. तुटलेल्या तारा व वाहून गेलेल्या वीजसाहित्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचन ठप्प झाले असून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे.



या पार्श्वभूमीवर शिरापूर (सो) येथील शेतकरी अनिल पाटील यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. (एमएसईबी) मोहोळ कार्यालयास निवेदन देऊन नदीकाठचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती. वीजपुरवठा दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास १० नोव्हेंबर रोजी डी.पी.वर चढून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.



आज नियोजित आंदोलनाच्या वेळी मोहोळचे उपकार्यकारी अभियंता साहेब, देवकते साहेब तसेच एमएसईबीचे संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू केले. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांच्या चर्चेनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.


या वेळी मोहोळ पोलिस ठाण्याचे पी.आय. शेडगे साहेब यांनी योग्य समन्वय साधून मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादाचे स्वागत केले असून वीजपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होईपर्यंत लक्ष ठेवले जाणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments