सोलापूर, २३ नोव्हेंबर:
सोलापूर विमानतळावर आज सकाळी दिल्लीला प्रस्थान करत असताना भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा अल्प विश्रांतीसाठी थांबा झाला. या प्रसंगी सोलापूर बार असोसिएशन, न्यायव्यवस्था आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले.
न्यायमूर्ती गवई यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष रियाज शेख, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज कुमार शर्मा, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सत्र न्यायाधीश योगेश राणे, सिव्हिल जज (वरिष्ठ विभाग) ओमप्रकाश पाटील, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक मुकुंद ढोबळे यांच्यासह न्यायव्यवस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
केवळ पाच मिनिटांच्या या अल्प थांब्यादरम्यान न्यायमूर्ती गवई यांनी सोलापूरबद्दल आपुलकी व्यक्त करत, “भविष्यात सोलापूरला भेट देण्यास मला आनंद होईल,” असे आश्वासन दिले. त्यांनी या भेटीला “ऐतिहासिक क्षण” म्हटले आणि उपस्थितांशी संवाद साधताना आनंद व्यक्त केला.
या स्वागत प्रसंगामुळे सोलापूर शहरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.




0 Comments