सोलापूर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी – सांगोला तालुक्यातील चेनके गावातील भीमनगर येथील बुद्धविहारासमोर एप्रिल २०२५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवकाळात गावातील काही लोकांनी रात्री अनधिकृतरित्या संभाजी महाराजांचा पुतळा बसविला होता. दुसऱ्या दिवशी बौद्ध समाजातील लोकांनी त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थापन केला.
या घटनेनंतर ग्रामपंचायत, तहसीलदार आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी गावाला भेट देऊन फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटविण्याचा निर्णय घेतला, तर संभाजी महाराजांचा पुतळा तसाच ठेवण्यात आला. या निर्णयाविरोधात बौद्ध समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, गेले सात महिने ते या अन्यायाविरोधात शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.
या आंदोलनाचा एक भाग म्हणून दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ पासून चेनके गाव ते सोलापूर असा १२० किलोमीटरचा पदयात्रा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सोलापुरातील हब्बू वस्ती, जुना देगाव नाका येथे पोहोचला. या ठिकाणी रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा प्रभारी सिद्धार्थ कांबळे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब मसलखांब, नरेन कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते एन. के. क्षीरसागर यांनी पदयात्रेतील सहभागींची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.
यानंतर ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पदयात्रेने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चेनके गावात शासनाच्या माध्यमातून पुनर्स्थापित करण्याची मागणीचे निवेदन दिले.
सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुनम उपोषण गेट येथे बौद्ध समाजाचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून, जोपर्यंत शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुनर्स्थापित केला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा ठाम निर्धार समाजाने व्यक्त केला आहे.

0 Comments