सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज |दिनांक- 17 जानेवारी 2026
रुद्र रिसर्च अॅण्ड अॅनालिटिक्स, पुणे या आमच्या संस्थेने 15 जानेवारी 2026 रोजी मुंबई महानगरपालिकेचा एग्झिट पोल प्रदर्शित केला. सर्वेक्षण, ग्राउंड इंटेलिजन्स आणि डेटा संशोधनाच्या माध्यमातून संस्थेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या विविध पैलूंवर सखोल अभ्यास करून अंदाज वर्तवला. 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा जागांसंदर्भातील आमचा एक्झिट पोल अचूक ठरला होता. याशिवाय, त्याआधी महाराष्ट्र विधानसभा पोटनिवडणुकांमधील अंदाजही खरा ठरला होता. त्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा एग्झिट पोल तंतोतंत खरा ठरला आहे.
मुंबई महानगरपालिकेसाठी रुद्र रिसर्च अॅण्ड अॅनालिटिक्स या आमच्या संस्थेने भाजपचे 80 ते 90 नगरसेवक निवडून येतील आणि महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप असेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल आणि त्यांचे 60 ते 70 नगरसेवक निवडून येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली होती. त्यानुसार प्रत्यक्ष निकालामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या 35 ते 40 जागा निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्ष निकालामध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. हा देखील अंदाज किमान संख्येच्या अधिक जवळ जाणारा ठरला आहे. त्यानंतर ‘रुद्र रिसर्च अॅण्ड अॅनालिटिक्स’च्या अंदाजानुसार काँग्रेस पक्षाचे 22 ते 27 नगरसेवक निवडून येतील असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्ष निकालामध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक निवडून आले आहेत. यासोबतच मनसेचे 7 ते 12 नगरसेवक निवडून येतील असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे 2 ते 3, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 0 ते 1 आणि इतर अपक्ष 8 ते 12 नगरसेवक निवडून येतील असा अंदाज वर्तवला होता. या पक्षांचे अनुक्रमे 3, 1 आणि अपक्ष 10 नगरसेवक निवडून आले आहेत.
‘रुद्र रिसर्च अॅण्ड अॅनालिटिक्स’च्या एग्झिट पोलनुसार मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) युतीला 115 ते 130 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्ष निकालात महायुतीला 118 जागा मिळाल्या आहेत. तसेच एग्झिट पोलमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेला 67 ते 82 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. अंतिम निकालामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचे 71 नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला एकत्रितपणे 22 ते 27 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात त्यांचे 24 नगरसेवक निवडून आले आहेत. यानुसार आघाडीनिहाय अंदाज देखील तंतोतंत खरा ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबई महानगरपालिकेचा आघाडी आणि युतीनिहाय मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज देखील ठरला अचूक:-
‘रुद्र रिसर्च अॅण्ड अॅनालिटिक्स’च्या एग्झिट पोलनुसार भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) महायुतीला 39% मते मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. अंतिम निकालानंतर महायुतीला 41% मते मिळाली आहेत. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे युतीला 33% मते मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. अंतिम निकालामध्ये ठाकरेंच्या युतीला 30% मते मिळाली आहेत. तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला 12% मते मिळण्याचा अंदाज होता. निकालामध्ये त्यांना 13% मते मिळाली आहेत. तसेच इतर अपक्षांना 16% मते मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्ष निकालात देखील अपक्षांना 16% मतदारांची साथ मिळाली आहे.
‘रुद्र रिसर्च’ची सातत्यपूर्ण कामगिरी, जमिनीवर आधारित असलेली संशोधन पद्धती आणि पारदर्शक विश्लेषण यामुळे मुंबई महानगरपालिकेचा अंदाज अचूक ठरला आहे.


0 Comments