रविवारचा चहा 🍵 क्र. १८८
वीतभर पोट
वीतभर पोट हे माणसाला काय काय करायला लागतं,एका अभंगात तुकाराम महाराज सांगतात,
"वितीयेवढेंसें पोट ।
केवढा बोभाट तयाचा ।।
जळो याची विटंबना ।
भूक जना नाचवी ।।"
आजही लक्षावधी माणसं आपलं गाव, घरदार, मायबाप, मित्रमंडळी, आपली माणसं सोडून दूर दूर अज्ञात प्रदेशाकडे धावत असतात. कशासाठी? पोटासाठी ! कशासाठी?पोटासाठी ! जिवाची काहिली होत असतांनाही गावापासून, घरापासून, प्रियजनांपासून दूर का ? कशासाठी? पोटासाठी ! कशासाठी ? पोटासाठी ! पोट कुठे घेऊन जाईल याचा नेम नाही. पोटासाठी झगडत असतो. गावाच्या, घराच्या आठवणीने विव्हळत असतो. त्याच्या ह्रदयवेदना अण्णाभाऊंच्या मुखातून शब्दरुप घेऊन बाहेर पडते,
"माझी मैना गावाकडे राहिली.. माझ्या जिवाची होतीया काहिली ।"
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून जन्माला आलेलं हे अप्रतिम, अजरामर गीत आजही ऐकताना छातीत कळ उठवतं. कशासाठी? पोटाच्या भुकेसाठी ! यावरून एक जुनी लावणी आठवली. दिवस भरत आलेल्या एक तमाशा कलावंत (विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर)स्त्रीला नाईलाजाने स्टेजवर नाचावं लागत असतं. ती म्हणते,
"लाज धरा पाव्हणं जरा जनाची मनाची ।
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची ।।"
नाचता नाचताच अशी वेळ येते की तिला स्टेजवरच पडद्याचा आडोसा करावा लागतो. नवनजात बाळाचा टँह्या टँह्या आवाज कानावर येतो, पण मद्यधुंद माजोरा प्रेक्षक ओरडतो नाच सुरु करता का नाही? की जाळू तंबू ? आणि मग तशाही अवस्थेत त्या नवजात बालकाला ह्यदयाशी कुरवाळण्याऐवजी दुसऱ्यांच्या हाती देते आणि मग परत लावणीच्या ठेक्यावर नृत्य सुरु होतं. जंगलातलं एखादं आदिवासीचं पोर, गावातलं शेतकऱ्याचं, कामगाराचं, दलिताचं पोर सैन्यात भरती होतं. आपल्या गावापासून घरापासून, माणसांपासून हजारो मैल दूर सरहद्दीवर, हिमालयाच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत, सियाचीनसारख्या अतिदुर्गम प्रदेशात, केव्हा, कुठून गोळी येईल आणि घेतलेला श्वास अखेरचा ठरेल याची शाश्वती नसलेल्या परिस्थितीत गस्त घालत असतो. कशासाठी?पोटासाठी! कशासाठी? पोटासाठी! च्या तालावर पावलं टाकत असतो.
काही पुराण कथा मध्ये असा उल्लेख आहे की जगतनिर्मात्यांनी जेव्हा सृष्टी निर्माण केली त्यावेळी जनावरांना दोन पोटं आणि माणसाला एकच पोटं दिलं म्हणून माणूस त्या जगतनिर्मात्याकडे जाऊन भांडू लागला, त्यावर तो जगत निर्माता माणसाला बोलला तू आधी एक तर भरून दाखव, मग दुसऱ्या पोटाचा विचार कर. थोडक्यात काय इथं एक पोट भरायची भ्रातं आहे आणि हा माणूस दोन पोटं मागायला गेला. आपल्याकडे म्हणतात ना जो जन्माला आला आहे त्याची खाण्याची सोय ते ईश्वराने आधीच करून ठेवलेली असते. प्रत्येकाचे पोट एक विती एवढेच पण त्याला भरण्याची चिंता माणसाला जीवनभर सतवते. यावर आणखीन एका अभंगात तुकोबा म्हणतात,
हे चि चिंता काय खावे म्हणऊनि l
भले तुजहुनि पक्षीराज ll
अरे माणसा रोज काय खावे याची चिंता करण्यापेक्षा जरा राजाप्रमाणे जगणाऱ्या पक्षाकडे बघ, तुझ्यापेक्षा कितीतरी बरे ते. जगण्यासाठी खाणे वेगळे आणि खाण्यासाठी जगणं वेगळं. चिंता चांगले जेवणाची नाही तर चांगलं जीवन जगण्याची करावी.
प्रा.दिलीप आनंदराव जाधव,सांगली.
सचिव
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,सांगली.
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ,महाराष्ट्र राज्य.

0 Comments