मंद्रूप | दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
मंद्रूप येथील ग्रामदैवत श्री मळसिध्द यात्रेनिमित्त दि. १३, १४ व १५ जानेवारी २०२६ दरम्यान प्रथमच तीन दिवसीय जिल्हास्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी भव्य मंडप उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे.
या प्रदर्शनामध्ये नामवंत कृषी कंपन्यांचा सहभाग असणार असून, शेतकरी बांधवांसाठी आधुनिक शेतीविषयक माहिती व तंत्रज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
प्रदर्शन स्थळाच्या मैदानाचे पूजन श्री मळसिध्द देवस्थानचे गदगीचे पुजारी गेनसिध्द पुजारी तसेच श्री मळसिध्द देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटीचे अध्यक्ष अँड. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री मळसिध्द देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले की, दरवर्षी १२ ते १६ जानेवारी या कालावधीत पाच दिवस श्री मळसिध्द यात्रा संपन्न होत असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीपासून यात्रेनिमित्त शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करावे, तसेच अक्षता सोहळ्याच्या दिवशी लक्ष दीपोत्सव आयोजित करावा, अशी सूचना पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी यात्रेच्या नियोजन बैठकीत केली होती. त्यानुसार यंदा प्रथमच कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना शेतीपूरक यांत्रिक अवजारे, आधुनिक यंत्रसामग्री, नवनवीन पीक पद्धती, आधुनिक व सेंद्रिय शेती, तसेच उत्पादन वाढीसाठी करावयाचे प्रयोग यांची सविस्तर माहिती मिळणार आहे. यासोबतच गाय, बैल, म्हैस, घोडे, शेळी, वळू आदींचे पशुपक्षी प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे.
प्रदर्शनासाठी पत्र्याचे भव्य मंडप, हिरवे मॅट, हायमास्ट दिवे, विविध कंपन्यांसाठी मोठे स्टॉल, पिण्याचे पाणी, सुरक्षा रक्षक, अग्निशामक दल, रुग्णवाहिका यांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिक व शेतकरी बांधवांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत.
या कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन विविध राजकीय मान्यवर व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असून, तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व नागरिकांच्या सहकार्याने हे प्रदर्शन यशस्वी होईल, असा विश्वास अँड. राजेश देशमुख यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री मळसिध्द देवस्थान यात्रा कमिटीचे अध्यक्ष अँड. राजेश देशमुख, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, तमण्णा पुजारी, पत्रकार पंचाक्षरी स्वामी, बाळासाहेब देशमुख, सुनील व्हनमाने, बिळेणसिध्द सुंटे, राधाकृष्ण गोसावी, रवीशंकर म्हेत्रे, रमेश नवले, अनंत म्हेत्रे, चंद्रकांत देशमुख, बाबुशा शेंडगे, सुरेश टेळे, अविनाश देशमुख, सोमनिंग पुजारी, बनसिध्द पुजारी, बिळेणी पुजारी, शिवानंद पुजारी, अनिकेत पाटील, सिकंदर आवटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments