Advertisement

Breaking News
Loading...

सांगोल्यात अवैध वाळू उपशावर एलसीबीची धडाकेबाज कारवाई; जेसीबीसह ₹ १४.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त...

 


कोळा (सांगोला) | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर :

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका–२०२६ च्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाच सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई केली. मौजे कोळा (ता. सांगोला) येथील ओढ्याच्या पात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून तिची चोरीची वाहतूक व विक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने छापा टाकून जेसीबीसह ट्रॅक्टर-ट्रॉली आणि वाळू असा एकूण १४,५७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक सांगोला पोलीस ठाणे हद्दीत गस्तीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. छाप्यात जेसीबीच्या सहाय्याने वाळू भरत असलेली ट्रॅक्टर-ट्रॉली आढळून आली; मात्र चालक घटनास्थळावरून पळून गेले.

या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७८/२०२६, बीएनएस कलम ३०३ (२) तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम ९ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालात ९ लाख रुपये किमतीची जेसीबी, ५.५० लाख रुपये किमतीची ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ७ हजार रुपये किमतीचा एक ब्रास वाळू यांचा समावेश आहे. पुढील तपास पो.ह. भरमशेट्टी (सांगोला पोलीस ठाणे) करीत आहेत.

या कारवाईत सपोनि विशाल वायकर, पोलीस हवालदार विरेश कलशेट्टी व पोलीस कॉन्स्टेबल यश देवकते यांनी सहभाग घेतला.

या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींची नावे:

राहुल अशोक बजबळकर, रा. कोळा, ता. सांगोला, जि. सोलापूर

आबा हारीबा कोळेकर, रा. कोळा, ता. सांगोला, जि. सोलापूर

पोलीस प्रशासनाने अवैध वाळू उपसा व पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या कृत्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा दिला आहे.



Post a Comment

0 Comments