सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर – सोलापूर शहर पोलिसांनी सामुहिक बलात्काराच्या खोट्या प्रकरणाचा पर्दाफाश करत एक मोठा कट उधळून लावला आहे. या प्रकरणी संबंधित महिला व तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली असून, निर्दोष व्यक्तींना अडकवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्क तपासामुळे उघडकीस आला आहे.
याबाबतची माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोनि (गुन्हे) सुशांत वराळे, सपोनि शितलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला व तिचा प्रियकर हे २०२२ पासून एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत. आरोपी प्रियकरावर यापूर्वी गंभीर गुन्हा दाखल असून त्याला अटकही झाली होती. मात्र, न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल झाले होते. १७ मार्च २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला.
या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपीला फायदा व्हावा व फिर्यादी व साक्षीदारांना अडकवण्यासाठी दोघांनी संगनमताने कट रचला. त्यानुसार १८ मार्च २०२६ रोजी रात्री संबंधित महिलेने डायल ११२ वर कॉल करून चार जणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची खोटी माहिती दिली.
घटनेची गांभीर्याने दखल घेत विजापूर नाका पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल सीडीआर विश्लेषण, वैद्यकीय तपासणी तसेच संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात आली. या तपासाअंती महिलेने स्वतः कबूल केले की तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून ही घटना पूर्णपणे खोटी आहे.
याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९९/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम २४८, २१७, ६१(२) अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीसांची कामगिरी :
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोनि सुशांत वराळे, सपोनि शितलकुमार गायकवाड, मसपोनि सविता मोरेपाटील, मसफो सविता क्षिरसागर यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकातील हार, पोहेकॉ फुटाणे, पोहेकॉ जाधव, पोकॉ सद्दाम अबादीराजे, पोकॉ अमृत पथक, सफौ अप्पा पवार, पोहेका अजय परदेशी, पोहेकॉ गणेश शिर्के, पोहेकॉ सुरवसे, पोकॉ कोर्सेगाव, पोकॉ समाधान मारकड, पोकॉ राहूल विटकर, पोकॉ स्वप्नील जाधव, पोकॉ संतोष माने, पोकॉ राठोड, पोकॉ साळुंखे तसेच पोलीस उपआयुक्त कार्यालयातील पोहेकॉ बागलकोटे, पोकॉ गायकवाड यांनी मोलाची भूमिका बजावली.
सोलापूर शहर पोलिसांच्या तत्पर आणि बारकाईच्या तपासामुळे गंभीर गुन्ह्याचा खोटा बनाव उघडकीस आला असून निर्दोष नागरिकांना न्याय मिळवून देण्यात यश आले आहे.


0 Comments