✨ऋणानुबंधाच्या पलीकडे मदन निकम सरांचा गौरवशाली प्रवास✨
"कार्य लाभले शिक्षणाचे होते ध्येय विद्यार्थी घडवण्याचे,
कला, क्रीडा अन् सुसंस्कारातून फुललेले मोती यश साफल्याचे..."
शिक्षक हा समाजाचा तो शिल्पकार असतो जो मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचे सोन्यात रूपांतर करतो. अशाच एका ध्येयवेढ्या शिल्पकाराचा, म्हणजे आदरणीय मदन मारुती निकम ( एम.ए. बी.एड ) सरांचा सेवानिवृत्तीचा क्षण; 34 वर्षाचा हा प्रदीर्घ प्रवास म्हणजे केवळ नोकरी नव्हती. तर ती एक व्रतस्थ तपश्चर्या होती.
संघर्षातून उभे राहिले नेतृत्व म्हणजे निकम सर. 28 मार्च 1969 रोजी करवीर तालुक्यातील कंदल गावाच्या पवित्र मातीत सरांचा जन्म झाला. ग्रामीण भागातील साध्या वातावरणात वाढलेल्या मदन सरांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. शिवाजी विद्यापीठातून मराठी विषयात एम. ए. पूर्ण केल्यानंतर 1 जून 1991 रोजी ईश्वरा वाडकर हायस्कूल दिंडनेर्ली येथे पहिले पाऊल ठेवले. तो काळ संघर्षाचा होता. शाळा विनाअनुदानित होती. खिसा रिकामा होता पण उराशी स्वप्ने मोठी होती.
"कधी ऊन आले, कधी सावली आली, जिद्दीच्या वाटेवरती पावले कधी न थकली."
सलग सहा वर्षे विनाअनुदानित तत्त्वावर काम करताना सरांनी कधीच तक्रार केली नाही. त्यांच्या याच चिकाटीमुळे 1997 मध्ये शाळेला अनुदान मिळाले. हा केवळ सरांचा विजय नव्हता, तर दिंडनेर्ली गावातील शेकडो गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विजय होता.
मदन सरांचे व्यक्तिमत्व केवळ वर्गातील फळ्या पुरते मर्यादित राहिले नाही, त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनगटात बळ भरले. कुस्ती, ॲथलेटिक्स, खो-खो आणि व्हॉलीबॉल यांसारख्या खेळात त्यांनी ग्रामीण भागातील हिऱ्यांना पैलू पाडले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदके पटकावली.
"मैदानाच्या धुळीत त्यांनी घाम गाळला,
त्यांच्याच हाती यशाचा तो कलश लाभला..!"
स्काऊटच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि देशप्रेम रुजवले. अर्जुनवाडा आणि खेबवडे हायस्कूलमध्ये काम करतानाही त्यांनी आपली हीच क्रीडा संस्कृती जिवंत ठेवली.
सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कौशल्य असणारे मदन सर हे केवळ शिक्षक नव्हते, तर ते एक जागरूक समाजसेवक ही राहिले. अंधश्रद्धा निर्मूलन असो, व्यसनमुक्तीची चळवळ असो वा तलाव स्वच्छतेचे श्रमदान सरांचा सहभाग नेहमीच अग्रभागी राहिला. त्यांच्या या कामाची पावती म्हणूनच 2022 मध्ये कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत ते विक्रमी मतांनी विजयी झाले आणि चेअरमन म्हणून त्यांनी शिक्षकांच्या कल्याणासाठी मोठे काम केले.
"माणुसकीच्या नात्याने ज्यांनी माणसे जोडली,
त्यांच्याच कार्याची कीर्ती चोहीकडे पसरली...!"
✨एक कृतज्ञ निरोप✨
सरांच्या या यशात त्यांच्या पत्नी, चिरंजीव आणि कन्या यांची साथ लाभली. आज निवृत्त होताना त्यांच्या डोळ्यासमोर 34 वर्षातील हजारो विद्यार्थ्यांचे चेहरे असतील जे आज समाजाच्या विविध क्षेत्रात मोठे झाले आहेत. निकम सर हे केवळ एक शिक्षक नसून, ते या संस्थेचे एक मजबूत आधारस्तंभ होते.
"निवृत्ती म्हणजे विराम नव्हे, नव्या प्रवासाची नांदी आहे,
तुमच्या कार्याचा सुगंध, आम्हा सर्वांच्या मनी सदैव जिवंत आहे...!"
आजचा हा सोहळा केवळ एका शिक्षकाचा निरोप नसून एका ध्येयनिष्ठ प्रवासाचा गौरव आहे. या प्रवासात सरांना अनेक मान्यवरांचे आणि लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन लाभले, त्यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार दत्तात्रय सावंत सर, कोजिमाशी पतसंस्थेचे सर्वेसर्वा दादासाहेब लाड सर तसेच महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांचा उल्लेख अत्यंत गरजेचे आहे.
'निकम सरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी नेहमीच त्यांना मोलाचे सहकार्य केले.'
माझे जिवलग मित्र व विश्वासू व्यक्तिमत्व आदरणीय निकम सर आज तुम्ही शाळेतून शारीरिकदृष्ट्या निवृत्त होत असलात, तरी आमच्या हृदयात तुमचे स्थान अढळ आहे. ईश्वराकडे हीच प्रार्थना आहे की, आपले पुढील आयुष्य अत्यंत सुखमय, आरोग्यदायी आणि आनंदी जावे. तुम्हाला सेवानिवृत्ती दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!
आपलाच,
श्री. राजेंद्र महादेव आसबे
सहशिक्षक:- साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तावशी.
संपर्कप्रमुख:- महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती पुणे जिल्हा.
जिल्हाध्यक्ष:- सोलापूर जिल्हा मराठा अध्यक्ष संघ, सोलापूर.
संचालक:- सोलापूर जिल्हा कृती समिती मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्यादित पंढरपूर.



0 Comments