गंगेवाडी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |
दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी आणि कासेगाव परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत दगड उत्खनन आणि खडी क्रशरचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महसूल प्रशासनाने सहा अनधिकृत खडी क्रशर प्लांटवर सील ठोकल्यानंतरही सील तोडून पुन्हा क्रशर सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंत्राटदार भोसले आणि ज्योतिबा रणदिवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी होणारे ब्लास्टिंग आणि क्रशरच्या आवाजामुळे परिसरातील गावे हादरत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी १९ नोव्हेंबर रोजी गंगेवाडी येथील सहा अनधिकृत खडी क्रशर प्लांटला सील ठोकण्याची कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही संबंधितांनी सील तोडून पुन्हा क्रशर सुरू केल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. त्यानुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून महसूल विभागाकडून पुढील चौकशी सुरू आहे.
रात्रीच्या ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थ भयभीत
गंगेवाडी आणि कासेगाव परिसरात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे घरांना हादरे बसत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत. ब्लास्टिंगच्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खाण परिसरातील शेतजमीन, घरे आणि पर्यावरणालाही धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने यापूर्वी ब्लास्टिंग बंद करण्याचे आदेश दिले असतानाही प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे.
राजकीय पाठबळामुळे कारवाईला हरताळ?
या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय पाठबळाची किनार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. गंगेवाडी आणि कासेगाव परिसरात अनेक राजकीय नेते, कंत्राटदार आणि खाणमालक यांचे हितसंबंध असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. सील ठोकल्यानंतरही ते तोडून क्रशर सुरू करण्याचे धाडस नेमके कोणाच्या पाठबळावर केले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. अवैध उत्खनन करणाऱ्यांना राजकीय अभय मिळत आहे का, याचीही प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थ एकवटण्याची शक्यता
या प्रकरणामुळे गंगेवाडी आणि कासेगाव परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे. अनधिकृत उत्खनन, रात्रीचे ब्लास्टिंग आणि नियमबाह्य क्रशरमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित खाणमालकांच्या परवानग्या, उत्खननाची मर्यादा, रॉयल्टी आणि इतर कागदपत्रांची सखोल तपासणी करण्याची मागणी होत आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास ग्रामस्थ एकत्र येऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
प्रशासनासमोर मोठे आव्हान
महसूल प्रशासनाने सील ठोकून कारवाई केली असतानाही पुन्हा क्रशर सुरू होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे केवळ गुन्हा दाखल करून थांबण्याऐवजी प्रत्यक्ष उत्खनन पूर्णपणे बंद करणे, अनधिकृत क्रशर कायमस्वरूपी बंद ठेवणे आणि ब्लास्टिंगवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. तसेच या व्यवसायाला कोणाचे राजकीय किंवा अन्य पाठबळ आहे का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
प्रशासनाच्या सीललाच आव्हान देण्याचे धाडस होत असेल, तर या अवैध व्यवसायामागे नेमके कोणाचे हात आहेत? राजकीय पाठबळाच्या चर्चेतील सत्य बाहेर येणार का आणि ग्रामस्थांना ब्लास्टिंगच्या दहशतीतून दिलासा मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हॅलो रिपोर्टर न्यूज | तुमची बातमी आम्ही पोहोचवतो हजारोपर्यंत!


0 Comments