Advertisement

Breaking News
Loading...

सावळेश्वर टोल नाक्यावर ‘रणांगण’! चालकाला मारहाण; संतप्त ट्रकचालकांचा उद्रेक, तोडफोडीत महामार्ग ठप्प...

 


मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर मंगळवारी (ता. २४) दुपारी चारच्या सुमारास हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. 

टोल कर्मचाऱ्यांकडून एका ट्रकचालकाला बेदम मारहाण केल्याच्या घटनेनंतर संतप्त ट्रकचालकांनी टोल नाक्यावर धडक देत मोठी तोडफोड केली. या प्रकारामुळे महामार्गावर तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून पुण्याकडे मालट्रक घेऊन जाणारे चालक सिद्धू स्वामी (वय ३२, रा. बसवकल्याण) आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये टोल भरण्यावरून वाद झाला. हा वाद चिघळत जाऊन कर्मचाऱ्यांनी स्वामी यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालकांचा संताप अनावर:

सहकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच महामार्गावरील इतर ट्रकचालक संतप्त झाले. त्यांनी मोठ्या संख्येने टोल नाक्यावर जमा होत केबिन, काच व अन्य साहित्याची तोडफोड केली. यावेळी अघोषित ‘रास्ता रोको’ करण्यात आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

पोलीसांचा हस्तक्षेप:

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने राज्य राखीव पोलीस दलाला (SRPF) पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, हेडकॉन्स्टेबल गजानन माळी व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले. काही वेळानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली.

चालक वर्गात संताप:

पंढरपूर येथील घटनेनंतर पुन्हा चालकावर झालेल्या मारहाणीमुळे चालक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

Post a Comment

0 Comments