मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दि. १ जुलै २०२६ :
शिरापूर–लोकमंगल रस्त्याचे काम आज (दि. १ जुलै) सुरू करण्यासाठी नागरिक व संबंधित मंडळी घटनास्थळी पोहोचली होती. मात्र, काही राजकीय पुढाऱ्यांनी जेसीबी मालकाच्या मनात "काम सुरू केल्यास गुन्हे दाखल होतील" अशी भीती निर्माण केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. त्यामुळे काम सुरू होऊ शकले नाही आणि रस्त्याच्या कामात पुन्हा अडथळा निर्माण झाला.
सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांच्या म्हणण्यानुसार, काही राजकीय व्यक्तींनी खोटी माहिती पसरवून कामात अडथळा आणल्यामुळे आजचे नियोजित काम रखडले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, दि. ३ जुलै २०२६ रोजी ‘भीक मागो आंदोलन’ करून रस्त्याच्या कामासाठी निधी गोळा करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी कायम ठेवला आहे. "राजकीय अडथळे कितीही आले तरी आंदोलन मागे घेणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या प्रश्नावर कोणती भूमिका घेतात, याकडे शिरापूर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


0 Comments