सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |राज्यभरातील लाखो शिक्षक भरती इच्छुकांना मोठा धक्का बसला असून, दि. 28 जून 2026 रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीत दिली आहे.
परिषदेच्या माहितीनुसार, भिवंडी येथे गुप्त माहितीनंतर पोलिसांनी छापा टाकला असता काही व्यक्तींकडे TET 2026 च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी साधर्म्य असलेली माहिती आढळून आली. त्यानंतर परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पडताळणी केली असता संबंधित प्रश्न समान असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावी, या भूमिकेतून तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक असल्याने 28 जूनची TET परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या परीक्षेची तारीख व इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.


0 Comments