Advertisement

Breaking News
Loading...

मराठी भाषा शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन; व्याकरणमहर्षी रंगनाथ सुंबे यांचे मार्गदर्शन तसेच गुणवंत शिक्षकांचा होणार सन्मान...

 


पंढरपूर | प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळाच्या वतीने मराठी भाषा शिक्षकांसाठी टीईटी परीक्षेच्या अनुषंगाने तसेच अध्यापनातील 'समग्र व्याकरण' या विषयावर एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 10 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सिंहगड कॉलेज, पंढरपूर येथे होणाऱ्या या कार्यशाळेत व्याकरणमहर्षी रंगनाथ सुंबे हे मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेची माहिती सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आसबे यांनी दिली. सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सहविचार सभेत विविध विषयांवर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे असणार आहेत. दुपारच्या सत्रात जिल्ह्यातील मराठी विषय शिकविणाऱ्या निवडक गुणवंत शिक्षकांचा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

सोलापूर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या आदेशानुसार या कार्यशाळेला उपस्थित राहणाऱ्या मराठी विषय शिक्षकांची उपस्थिती मुख्याध्यापकांनी 'कर्तव्यकाळ' म्हणून नोंदवावी व संबंधित शिक्षकांना कार्यशाळेसाठी पाठविण्याचे आवाहन मंडळाचे जिल्हा सचिव शशिकांत उपासे व शिवाजी कौलगे यांनी केले आहे.

याशिवाय, दि. 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान मालगुंड - गणपतीपुळे येथे मराठी विषय शिक्षकांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक शिक्षकांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असेही आवाहन करण्यात आले. तसेच अभिजात मराठी भाषा आणि मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्याबाबतही सभेत चर्चा झाली.

या सहविचार सभेला रंगसिद्ध कोरे, सुभाष भीमणवरु, अमोगसिद्ध देशमुख, बाळकृष्ण माळी, मिनेशकुमार टोणपे, काकासाहेब जगताप, राजेंद्र माळी, चेतन देडे, उज्ज्वला साळुंके, रवी देवकर यांच्यासह मराठी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments