रविवारचा चहा क्रमांक- २१२
नशीब नाही,शिवण आपल्या हातात.
धागा तुटला की आपण काय करतो? क्षणभर चिडतो, मग दुसरा धागा शोधतो, सुईत ओवतो आणि फाटलेलं ठिगळ लावतो. शिंपी कधी कपड्याला शिव्या देत बसत नाही. तो फक्त तुटलेला भाग जोडतो. तेच तर आयुष्य आहे.
आजच्या वेगवान काळात माणूस शर्यतीच्या घोड्यासारखा धावतोय. मार्क्स जास्त, पगार मोठा, गाडी महाग, घर मोठं... हीच शर्यत. या शर्यतीत एकदा धडपडलं की माणसाला वाटतं जग संपलं. व्यवसायात तोटा झाला की तो स्वतःलाच तोटा समजू लागतो. नात्यात दुरावा आला की तो आरशात पाहिलेल्या चेहऱ्यालाच ओळखेनासा होतो. अपयश आल्यावर पहिला दोष जातो नशिबावर. अडचण आली की परिस्थितीवर. संघर्ष करायची वेळ आली की काळावर. स्वतःच्या हातली सुई आणि दोरा तो विसरून जातो.
एका विद्यार्थ्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले की त्याला वाटतं आयुष्य संपलं. शेतकऱ्याचं पीक अवकाळी पावसात वाहून गेलं की तो डोळे पुसत बसतो. बेरोजगार तरुणाला मुलाखतीत नकार मिळाला की तो स्वतःच्या कुवतीवरच प्रश्नचिन्ह लावतो. आणि मग तेच वाक्य: “माझ्या नशिबातच नाही”, “देवानेच असं लिहिलंय”, “माझं कर्मच वाईट”.
पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. जे तुटतं ते जोडता येतं. जे हरवतं ते परत मिळवता येतं. फक्त त्यासाठी सुई टोचण्याची वेदना सहन करावी लागते. धागा ओवताना बोटाला टोचतं, पण त्याच टोचण्यातून फाटलेला कपडा नव्याने आकार घेतो. संघर्ष हीच ती सुई आहे. ती टोचते, रडवते, पण आयुष्याला आकारही देते.
दोरा स्वतः झिजतो. स्वतःला ओढून, ताणून तो दोन तुकडे एकत्र ठेवतो. समाजाचंही तसंच आहे. एका समाजावर अन्याय झाला, हक्क नाकारले गेले, प्रतिष्ठा पायदळी तुडवली गेली, तरी तो समाज पुन्हा उभा राहू शकतो. त्यासाठी लागतो आत्मविश्वासाची सुई आणि एकतेचा दोरा. विखुरलेल्या धाग्यांचं वस्त्र होत नाही. विभागलेल्या समाजाचं परिवर्तन होत नाही. आज आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती जोडणाऱ्या हातांची, तोडणाऱ्या जिभांची नाही.
घराघरातले धागेही कमकुवत झाले आहेत. संवाद नाही, फक्त मेसेज आहेत. समजूत नाही, फक्त अपेक्षा आहेत. अहंकार मोठा झाला, आणि नात्यांची फट मोठी झाली. छोटी फट वेळेवर शिवली नाही की ती दरी बनते. क्षमा हा पहिला टाका आहे. समजूतदारपणा हा दुसरा. आणि मनापासून केलेला संवाद म्हणजे तो मजबूत शिवणाचा टाका. जेव्हा नात्याचे धागे तुटतात, तेव्हा माणूस गर्दीत असूनही एकटा पडतो. त्याच्याभोवती शेकडो नंबर्स असतात, पण फोन करावा असा एकही माणूस नसतो.
समाजातले शिक्षक, लेखक, पत्रकार, कार्यकर्ते... ही सगळी मंडळी म्हणजे समाजाचे शिंपी आहेत. ते स्वतःचं सुख बाजूला ठेवून तुटले धागे शोधतात. द्वेषाने फाटलेला समाज, जातीच्या नावाने तुटलेली एकता, धर्माच्या नावाने झालेली भेगा... या सगळ्याला ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतात. कारण तोडणं सोपं आहे. एका वाक्यानं विश्वास तुटतो. एका पोस्टनं नातं तुटतं. पण तोच विश्वास, तेच नातं पुन्हा जोडायला वर्षं लागतात. घाम गाळावा लागतो.
नशीब आपल्या हात नसतं, हे खरं. पण नशीबाच्या पानावर आपणच शाईने लिहतो, हेही तितकंच खरं. प्रयत्न, विचार, संघर्ष आणि कृती... ही चार अक्षरं नशीबाची व्याख्याच बदलून टाकतात. इतिहास पाहा. ज्यांनी नशिबावर डोके ठेवून झोप काढली त्यांचं नाव कुठेच नाही. ज्यांनी तुटलेल्या परिस्थितीला सुई-दोऱ्यानं शिवलं, त्यांनीच इतिहास घडवला.
फाटलेला कपडा शिंपी शिवू शकतो. खचलेलं मन आशा शिवू शकते. विखुरलेला समाज एकता शिवू शकते. पण त्यासाठी हातात सुई घ्यावी लागते. बोट टोचून घ्यावं लागतं. संयमानं एक-एक टाका मारावा लागतो. घाई केली की शिवण वेडीवाकडी होते. संयम ठेवला की फाटलेला भाग अधिकच सुंदर दिसू लागतो. जपानी लोक त्याला ‘किंत्सुगी’ म्हणतात - तुटलेल्या मातीच्या भांड्याला सोन्याने जोडणं. त्या भेगाचं सौंदर्यच वेगळं असतं. आपल्या आयुष्यातील व्रणही तसेच आहेत. ते लपवू नका, ते सोन्यानं जोडा.
जीवन म्हणजे सुई-दोऱ्याचा खेळच आहे. कधी धागे इतके घट्ट विणले जातात की वाटतं हे नातं कधीच तुटणार नाही. कधी अचानक एक झटका येतो आणि सगळे धागे सुटतात. पण प्रत्येक तुटलेला धागा हा केवळ वेदना देत नाही, तो एक धडा देऊन जातो. कोणावर किती विश्वास ठेवावा, कोणती अपेक्षा किती ठेवावी, अपयशातून कसं उठावं... हे सगळं तेच तुटलेले धागे शिकवतात.
म्हणून आजपासून एक सवय लावा. नशिबाला दोष देणं थांबवा. आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला विचारा: माझ्या आयुष्यात सध्या कोणता धागा तुटलाय? तो स्वप्नाचा धागा आहे का? शिक्षणाचा? नात्याचा? की स्वतःवरच्या विश्वासाचा? तो धागा शोधा. जमिनीवर पडू देऊ नका. उचला. सुईत ओवा. पहिला टाका मारा.
लक्षात ठेवा, ‘फाटकं असो वा तुटकं, नशीब सोडून सगळं काही शिवता येतं’. हा वाक्यप्रचार नाही, ही जगण्याची कला आहे. तुटलेल्या गोष्टींवर रडणारे जगात हजारो आहेत. पण त्या पुन्हा उभ्या करणारे मोजकेच. आणि इतिहास त्यांचाच होतो.
नशीब कदाचित लिहिलेलं असेल. पण आयुष्याची शिवण मात्र तुमच्या हातात आहे. ती सुई कधीही सुटू देऊ नका. तो दोरा कधीही हरवू देऊ नका. कारण जोपर्यंत शिवण्याची इच्छा आहे, तोपर्यंत आयुष्य संपत नसतं... ते नव्याने सुरू होत असतं.
आणि शेवटी एवढंच - धागे तुटतात तेव्हा आयुष्य संपत नाही, आयुष्य शिकवतं. तुम्ही कोणत्या धाग्याला आज पुन्हा शिवणार आहात?
प्रा. दिलीप आनंदराव जाधव, सांगली
सचिव - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य

0 Comments