Advertisement

Breaking News
Loading...

“मनगोळीतील जबरदस्तीच्या वसुली प्रकरणात मंद्रूप पोलिसांचा दणका; आरोपीला पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी..!” मंद्रूप पोलिसांची कायदेशीर लढाई यशस्वी..!

 


मनगोळी | हॅलो रिपोर्टर न्यूज | तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे | जबरदस्तीने पैसे काढून घेणे, अवैध व्याजाच्या पैशांसाठी दमदाटी करणे व फिर्यादीस त्रास देण्याच्या आरोपांप्रकरणी मंद्रूप पोलिसांनी तपासासाठी आवश्यक असलेली पोलीस कोठडी मिळविण्यासाठी न्यायालयीन स्तरावर प्रभावी पाठपुरावा केला. प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपीस थेट न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर मंद्रूप पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

नेमके प्रकरण काय?

मनगोळी येथील मल्लीनाथ सुरेश पाटील यांनी सागर अनिल जाधव याच्याकडून 30 हजार रुपये व्याजाने घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. सदर रक्कम सहा महिन्यांत परतफेड केल्यानंतरही आरोपीने आणखी दुप्पट रकमेची मागणी करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, 30 एप्रिल 2026 रोजी आरोपीने फिर्यादीस आपल्या घरी बोलावून घेतले. त्यावेळी पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला. झटापटीदरम्यान आरोपीने फिर्यादीच्या खिशातील 4,800 रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. तसेच शर्टाचा खिसा फाटला असून, वाहनाची चावीही काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

29 ऑगस्टला अटक; थेट न्यायालयीन कोठडी

गुन्ह्याच्या तपासादरम्यान सागर अनिल जाधव यास 29 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 8 वाजता अटक करण्यात आली. 30 ऑगस्ट रोजी त्याला न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले.

गुन्ह्यातील रक्कम व मोटारसायकलचा शोध घेणे तसेच पुढील तपासासाठी आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असल्याची मागणी तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांनी केली होती. मात्र, प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी दिली.

मंद्रूप पोलिसांचा जिल्हा व सत्र न्यायालयात पाठपुरावा:

तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याने तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक राज डांगे आणि सरकारी अभियोक्ता पी.जे. गवळी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी अधिवक्ता कविता बागल यांनी आरोपीची पुढील चौकशी तसेच गुन्ह्यातील मुद्देमालाची रिकव्हरी करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला.

सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत मा. जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथील मा. जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयाने आरोपी सागर अनिल जाधव यास पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

या आदेशामुळे गुन्ह्यातील मुद्देमालाची रिकव्हरी आणि पुढील तपासासाठी पोलिसांना महत्त्वाची संधी मिळाली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तसेच पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास करंडे व पोलीस उपनिरीक्षक अमित करपे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कारवाई केली.

या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम आदलिंग, पोलीस कॉन्स्टेबल लखन पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा काळे व विद्या कांबळे यांनी भूमिका बजावली.

“अटक करून तपास थांबत नाही”

पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करून केवळ आरोपीला अटक करणे एवढ्यावर तपास थांबत नाही. गुन्ह्यातील सत्य समोर आणणे, मुद्देमाल हस्तगत करणे आणि आवश्यक त्या प्रत्येक कायदेशीर मार्गाचा अवलंब करून तपास पूर्णत्वास नेणे, ही मंद्रूप पोलिसांची कार्यपद्धती आहे.

कायद्याच्या चौकटीत प्रभावी तपास आणि न्यायालयीन स्तरावर सक्षम पाठपुरावा करत मंद्रूप पोलिसांनी पुन्हा एकदा तपासातील आपली भूमिका ठळक केली आहे.


Post a Comment

0 Comments