मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | पतीपासून विभक्त राहत असलेल्या ४२ वर्षीय महिलेच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्यावर दीड वर्षांहून अधिक काळ अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रकाश संभाजी वाघमारे (रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) याला मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपी प्रकाश वाघमारे याने तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर जानेवारी २०२५ पासून २९ ऑगस्ट २०२६ दरम्यान आरोपीने पीडित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
आरोपीने पीडित महिलेला तसेच तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भीतीच्या वातावरणात महिला दीड वर्ष हा प्रकार सहन करत होती. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून तिने धाडस करत मंद्रूप पोलीस ठाण्यात धाव घेत आपली कैफियत मांडली.
महिलेच्या तक्रारीनंतर मंद्रूप पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून प्रकाश वाघमारे याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, तपास यंत्रणा पीडित महिलेच्या तक्रारीतील आरोपांची सखोल चौकशी करत आहे.
धमकीमुळे दीड वर्ष मौन; अखेर पोलिसांकडे धाव
पतीपासून विभक्त राहण्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आपल्यावर अत्याचार करण्यात आला तसेच मुलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे. दीर्घकाळ भीतीच्या छायेत राहिल्यानंतर अखेर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने हा प्रकार समोर आला.


0 Comments