मंद्रूप (सोलापूर ग्रामीण) : होनमुर्गी फाट्याजवळ कार थांबवून बसलेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवत तीन अज्ञात चोरट्यांनी सोन्याची चैन लंपास केल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री घडली. याबाबत तब्बल दोन महिन्यांनी फिर्यादी श्रीनिवास माळवदकर (वय २९, रा. अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तिघांवर बीएनएस कलम 309(4), 3(5) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी कामानिमित्त नांदणी टोल नाक्यावरून परत सोलापूरकडे जात असताना रात्री सुमारे १०.३० वाजता होनमुर्गी फाट्याजवळ कार उभी करून लघुशंका करण्यासाठी खाली उतरले. परत कारमध्ये बसताच पाठीमागून आलेली मोटारसायकल कारसमोर थांबली. त्यावरून उतरलेल्या तीन इसमांनी गळ्यावर चाकू लावून “आवाज करू नको, पैसे आणि सोने दे” अशी धमकी दिली.
दरम्यान, गळ्यातील सोन्याची चैन दिसताच तिघांनी मिळून ती हिसकावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने प्रतिकार केला तरी चाकू दाखवून आरोपींनी चैनचा अंदाजे ५ ग्रॅम वजनाचा अर्धवट तुकडा जबरदस्तीने तोडून घेतला. यावेळी एका चोरट्याने कारची चावीही काढून घेतली आणि तिघे मोटारसायकलवरून पसार झाले. चोरी गेलेल्या चैनची किंमत अंदाजे ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने सांगितले.
या घटनेतील आरोपींचे वय २० ते २५ वर्षे असल्याचे अंदाजे वर्णन फिर्यादीने दिले असून, “पुन्हा दिसल्यास मी त्यांना ओळखू शकतो” असेही नमूद केले आहे. अशाच प्रकारच्या चोरट्यांना पोलिसांनी नुकतेच पकडल्याचे फिर्यादीला वृत्तपत्रातून समजल्याने उशिरा का होईना फिर्यादीकडून तक्रार नोंदविण्यात आली.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

0 Comments