Advertisement

Breaking News
Loading...

शिक्षक नराधमास मरेपर्यंत जन्मठेप कारावास – १२ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी सोलापूर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल...

 

सोलापूर (हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी) : शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या प्रकरणात सोलापूर न्यायालयाने अत्यंत कठोर निर्णय देत शिक्षक धनाजी सोपान इंगळे (वय ४८, रा. पाटकुळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप आणि ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम पिडित मुलीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


हा निकाल मा. श्री. डी. एन. सुरवसे, ४ थे जिल्हा व सत्र न्यायाधीश, सोलापूर यांच्या न्यायालयाने दिला. सरकारी पक्षाची बाजू सौ. शीतल आ. डोके यांनी प्रभावीपणे मांडली, तर आरोपीची बाजू अॅड. धनंजय माने यांनी सांभाळली.


📅 घटनेचा सारांश:

१४ एप्रिल २०२३ रोजी आरोपी इंगळे यांनी शाळेत शिकवित असताना एका १२ वर्षीय विद्यार्थिनीला वर्गात थांबवून इतर विद्यार्थ्यांना बाहेर पाठवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.


ही घटना शाळेजवळील शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या नजरेस आली. संशय आल्याने त्याने पुढील दिवशी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. १५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी आरोपीने पुन्हा तोच घृणास्पद प्रकार केला आणि तो प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.



🎥 व्हिडिओ पुराव्याने आरोपीचा उघड झाला चेहरा:

शेतकऱ्याने हे चित्रीकरण घेऊन मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांसमोर सादर केले. चौकशीदरम्यान आरोपी धनाजी इंगळे स्वतः समोर आला आणि “माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा” असे कबूल केले.


👩‍👧 पिडित मुलीची साक्ष निर्णायक:

घाबरलेल्या मुलीने काही दिवसांनीच आपल्या वडिलांना प्रकार सांगितला. त्यानंतर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान डॉक्टर, शेतकरी, त्याचा भाऊ (चित्रीकरण करणारा) आणि मुलीची साक्ष यावरून आरोपीचा गुन्हा निर्विवाद सिद्ध झाला.


⚖️ न्यायालयाचा निकाल:

भा.द.वि. कलम ३५४अ, ३५४ब व “बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा” (POCSO) कलम ६ अंतर्गत आरोपी धनाजी इंगळे यास नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली गेली.


👮‍♂️ तपास पथक:

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राजू पवार (क्रमांक १८९६) यांनी केला.

Post a Comment

0 Comments