प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर
अकोले (मंद्रुप) ते गुंजेगाव रस्त्यावरील उजनी कालव्याच्या साईपट्टीवर एका ऊसतोड मजुराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास समोर आली.
मृत मजुराचे नाव अंबादास भीमा राठोड (वय ५५), रा. देवठाणा, पो. शिरसाळा, ता. धारूर, जि. बीड असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कालव्याच्या काठावर एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेला असल्याची माहिती मंद्रूप पोलिसांना मिळाली. त्याच्या बाजूला विषारी औषधाची बाटली आढळल्याने आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात आली. ग्रेड पीएसआय चव्हाण व हवालदार अश्पाक मियावाले यांनी घटनास्थळी पाहणी केली. प्रथम ओळख न पटल्याने अज्ञाताने आत्महत्या अशी नोंद झाली.
दरम्यान, समाज माध्यमांद्वारे माहिती मिळताच ऊसतोडणीसाठी आलेल्या बीड येथील मजुरांनी मृत व्यक्ती हा त्यांच्या टोळीतील अंबादास राठोड असल्याचे ओळख पटवली. सिद्धनाथ साखर कारखान्यासाठी देवठाणा (धारूर) येथील १४ जणांची टोळी पंधरा दिवसांपूर्वी या भागात आली होती. मयत राठोड यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन मुले देखील फडावर होती.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास राठोड यांना दारूचे व्यसन होते. सोमवारी दुपारी ऊस तोडणी सुरू असताना ते फडातून निघून गेले व रात्री परत आले नाहीत. रात्री उशिरा ते कालव्याजवळ मृत अवस्थेत आढळले. द्राक्षावर फवारणीसाठी वापरले जाणारे विषारी औषध त्यांनी प्राशन केल्याचे पोलिसांनी सांगितले. औषधाची बाटली पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास ग्रेड पीएसआय चव्हाण व हवालदार मियावाले करीत आहेत.

0 Comments