Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपमध्ये ट्रॅक्टरखाली सापडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू: मंद्रूप–टाकळी रस्त्यावर दुर्दैवी अपघात...

 


प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर


मंद्रूप ते टाकळी रस्त्यावर सोमवारी रात्री पावणे आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला. मृत मुलाचे नाव युवराज बिराप्पा व्हनमाने (वय १३), रा. टाकळी रोड, मंद्रूप असे आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, युवराज सोमवार रात्री मंद्रूप गावातून शेतातील त्यांच्या वस्तीकडे पायी जात होता. त्यावेळी मंद्रूपकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टर इंजिन (एमएच-१३ ईएक्स ०६१०) ने त्याला जोराची धडक दिली. धडक बसताच युवराज रस्त्याच्या खाली खड्ड्यात पडला. ट्रॅक्टर चालकाने धडकानंतर उडी मारल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर युवराजवर उलटला.


फिर्यादी अंबादास व्हनमारे व ट्रॅक्टर चालक सचिन धायगुडे यांनी मिळून युवराजला ट्रॅक्टरखालून बाहेर काढले. मात्र त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. बेशुद्ध अवस्थेत त्याला मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.


या अपघाताची नोंद मंद्रूप पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार सचिन मसलखांब पुढील तपास करीत आहेत.


दरम्यान, मयत युवराज हा मंद्रूप येथील महात्मा फुले विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होता. त्याला कुस्तीची प्रचंड आवड होती आणि परिसरातील विविध यात्रांमध्ये त्याने अनेक कुस्तीगीरांना पराभूत करत आपली छाप पाडली होती. त्याच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.


तेरा वर्षांच्या कोवळ्या मुलाचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू मंद्रूप व परिसरात हळहळ व्यक्त करत आहे.

Post a Comment

0 Comments