दक्षिण सोलापूर (हॅलो रिपोर्टर): – उसाला योग्य पहिली उचल मिळावी या मागणीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य बसवराज अर्जुन बगले (रा. हत्तरसंग कुडल) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ठाम आवाहन केले की, “कर्नाटकातील शेतकऱ्यांनी दरवाढीसाठी जसे उग्र आंदोलन केले, तशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ देऊ नका.”
गत काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना, पाणी संघर्ष समिती व ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने उस दरवाढीसाठी निवेदनांची मालिका दिली जात आहे. तरीही उसाच्या पहिल्या उचल दराबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने शेतकरी संतप्त आहेत. होनमुर्गी फाट्यावर करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर शेतकऱ्यांचा रोष आणखी उफाळला.
बसवराज बगले यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचा पिकावरील खर्च प्रचंड वाढला आहे, पावसाच्या अनियमिततेमुळे परिस्थिती बिकट आहे. या पार्श्वभूमीवर उसाला किमान ₹३४०० दर जाहीर न करणे ही शेतकऱ्यांची घोर अन्यायकारक पद्धती आहे. शासन व प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप केला नाही तर कर्नाटकप्रमाणे उग्र आंदोलन उभे राहण्याची जबाबदारी सरकारवर असेल.”
शेतकरी संघटनांचे मत आहे की, 2024-25 मध्ये नुकसानकारक परिस्थिती, वाढलेला उत्पादन खर्च, कारखानदारांची टाळाटाळ, शासनाचा विलंब हे सर्व घटक शेतकऱ्यांना आंदोलनाच्या उंबरठ्यावर घेऊन आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या आवाहनात बगले यांनी स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका; योग्य दर घोषित करा, अन्यथा पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल.” असे ते म्हणाले.

0 Comments