Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर बसस्थानकातील अस्वच्छ शौचालय प्रकरण गाजले; परिवहन मंत्र्यांच्या अचानक पाहणीत आगार व्यवस्थापक निलंबित...

 


सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्युज प्रतिनिधी:  मध्यवर्ती बसस्थानकातील मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था पुन्हा उघडकीस आली असून, यंदा थेट परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अचानक पाहणीत मोठी कारवाई झाली.



२८ नोव्हेंबर (शुक्रवार) रोजी सरनाईक यांनी बसस्थानकाला अचानक भेट दिली असता प्रसाधनगृहातील भीषण अस्वच्छता, उखडलेल्या फरशा, साफसफाईचा पूर्ण अभाव, तसेच पाणपोई परिसरातील दुर्गंधी आणि रखडलेली दुरुस्ती पाहून संताप व्यक्त केला. पाच नळांपैकी केवळ एकच नळ कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आणि संबंधितांना जाब विचारला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सोलापूर आगार व्यवस्थापकांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले.



यापूर्वीच सरनाईक यांनी आठवडाभरापूर्वी याच त्रुटींवर सुनावणी करून सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र परिस्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांनी “हे अजिबात चालणार नाही” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि कठोर कारवाई केली.



राज्यातील सर्व २५१ आगार प्रमुखांना दिलेल्या स्पष्ट इशाऱ्यात सरनाईक यांनी म्हटले आहे की, “प्रवासी सुविधा आणि विशेषतः महिला प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले तर तत्काळ कारवाई केली जाईल.”



मंत्र्यांच्या पुढील दौऱ्यात पुन्हा तपासणी होणार असून, हलगर्जीपणा आढळल्यास थेट निलंबनाचीच कारवाई होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Post a Comment

0 Comments