चिंचपूर (ता. दक्षिण सोलापूर):
गेल्या काही वर्षांत सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करत, लोकसंपर्क वाढवत आणि महिलांच्या हक्कांसाठी ठामपणे उभ्या राहिलेल्या शैलजा सिद्धाराम जानकर यांनी आता निबर्गी पंचायत समिती गण (भंडारकवठे गट) मधून जोरदार राजकीय पुनरागमनाची तयारी सुरू केली आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किंवा भाजप पक्षाकडून तिकीट मिळाल्यास त्या प्रत्यक्ष रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
१२ वी विज्ञान शाखेपर्यंत शिक्षण घेतलेल्या शैलजा जानकर यांचे पती सिद्धाराम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या विद्यमान तालुका उपाध्यक्ष आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे ते तालुका अध्यक्ष असताना तालुक्यात अनेक ठिकाणी त्यांनी पक्षाच्या शाखा उघडल्या. सिद्धाराम जानकर हे सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेले आणि लोकांमध्ये लोकप्रिय नाव. त्यांच्या कार्याचा प्रभाव शैलजा यांच्या लोकसंपर्कातही जाणवतो. गोरगरिबांच्या अडचणी सोडवणे, शासकीय योजना मिळवून देणे, महिलांच्या समस्या समजून घेणे अशा सर्व क्षेत्रांत त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.
गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ एका मताने झालेला पराभव—हा त्यांच्या जनाधाराला धक्का न देता उलट त्यांच्या कार्यक्षमतेवरची लोकांची खात्री अधिक दृढ करणारा ठरला. त्या पराभवानंतरही त्यांनी कामाची गती कमी न करता गावोगावी संपर्क मोहीम सुरूच ठेवली.
निबर्गी पंचायत समिती गणात शैलजा जानकरांच्या प्रवेशाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नव्या उत्साहाने आणि अधिक बळकट संघटनासह त्या निवडणुकीत उतरतील, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांत दिसत आहे.
राजकीय पाठबळही मजबूत:
माळशिरसचे विद्यमान आमदार उत्तम जानकर हे सिद्धाराम जानकरांच्या नात्यातील असून, त्यांच्या सर्वपक्षीय नेत्यांशी उत्कृष्ट संबंध आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित झाली तर तालुका पातळीवरच नव्हे तर जिल्हा राजकारणातही या निवडणुकीकडे पाहण्याचा वेगळाच दृष्टिकोन तयार होणार आहे.
आगामी निवडणुकीत शैलजा जानकर हे नाव तालुक्यात चर्चेचा आणि उत्सुकतेचा मुख्य केंद्रबिंदू बनले आहे. त्यांच्या दमदार पुनरागमनास सर्वसामान्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



0 Comments