दक्षिण सोलापूर (तालुका प्रतिनिधी) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली. पती-पत्नीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून, शनिवारी सकाळी दोघांनाही एकाच चितेवर अग्नी देण्यात आला.
शुक्रवारी दुपारी ३.०० वाजता किसन रामा हेगडे (७०) यांचे किरकोळ आजाराने निधन झाले. रात्री अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच, त्यांचा भाऊ बाहेरून येण्याची वाट पाहत होते. याच दरम्यान, रात्री ८.४५ वाजता पत्नी भामाबाई किसन हेगडे (६०) यांचेही निधन झाले. काही तासांतच पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची बातमी गावभर पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
शनिवारी सकाळी ९ वाजता, नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांनाही एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार असून, गावात अत्यंत शोकाकुल वातावरण पसरले आहे.

0 Comments