सोलापूर प्रतिनिधी – भारतातील परम सुपरकॉम्प्युटरचे जनक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सपत्नीक सोलापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाला विशेष सदिच्छा भेट दिली.
या भेटीचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या रोपवाटिका आणि बायोगॅस संयंत्र प्रकल्पांचे उद्घाटन डॉ. भटकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
नवीन रोपवाटीकेत 150 हून अधिक औषधी व प्राणवायू निर्माण करणाऱ्या वनस्पतींचा समावेश आहे. डॉ. भटकर यांनी पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व यावेळी अधोरेखित केले. तसेच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने ‘हरीतवारी’ उपक्रमांतर्गत राबवलेल्या दीड लाख वृक्षलागवड मोहिमेचे त्यांनी कौतुक केले.
दरम्यान, पोलीस मुख्यालयात बसविण्यात आलेल्या बायोगॅस संयंत्रातून कचऱ्यापासून स्वयंपाकासाठी आवश्यक गॅस तयार होणार असून, याचा वापर उपहारगृहातील अन्नपदार्थासाठी करण्यात येणार आहे. झाडांची पडलेली पाने, कचरा आदींच्या प्रक्रियेतून हा पर्यावरणस्नेही गॅस निर्माण होईल.
या कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक (गृह) मा. शिरीष हुंबे, पोलीस कल्याण शाखेचे निरीक्षक श्री. बाजीराव पोवार, राखीव पोलीस निरीक्षक श्री. कांबळे, तसेच पोलीस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments