Advertisement

Breaking News
Loading...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पाचट जाळू नये – चेअरमन महेश देशमुख यांचे आवाहन...

 

भंडारकवठे, दक्षिण सोलापूर – लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को-जनरेशन इ. लि. साखर कारखान्याचा २०२५-२६ गळीत हंगाम जोमात सुरू असताना भीमा–सीना खोऱ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणीनंतर पाचट जाळण्याचे टाळावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख यांनी केले आहे.



देशमुख यांनी सांगितले की, ऊस गेल्यानंतर पाचट जाळणे किंवा काढून टाकणे ही चुकीची पद्धत असून त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. पाचट शेतात ठेवल्यास जमिनीचे भौतिक, रसायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारतात तसेच ऊस उत्पादनात वाढ होते. साधारणपणे एकरी निघणाऱ्या उसाच्या प्रमाणाच्या १० टक्के पाचट उपलब्ध होते.


पाचट कुजवणीसाठी शेतकऱ्यांनी एकरी २ गोणी युरिया, २ गोणी सिंगल सुपर फॉस्फेट, कंपोस्टिंग कल्चर ५–१० किलो (किंवा १ लिटर द्रवरूप) वापरावे. तसेच कारखान्यातून मिळणारी प्रेसमड ५ ते ७ टन पाचटावर टाकल्यास कुज प्रक्रिया अधिक प्रभावी होते.


पूर्वी पाचट कुट्टी मशीन कमी प्रमाणात होती, मात्र आता परिसरात मोठ्या प्रमाणात मशीन उपलब्ध असल्याने पाचट व्यवस्थापन सोपे झाले आहे. पाचट जाळल्यास जमिनीची सुपीकता घटते आणि पुढील पिकावर घातक परिणाम होऊ शकतात, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.


उसाच्या पाचटाचे फायदे:

या संदर्भात दिपक नलवडे, सहाय्यक सरव्यवस्थापक, लोकमंगल भंडारकवठे यांनी सांगितले की—

पाचट जमिनीत ठेवल्यास सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते...

नैसर्गिक अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढून खत खर्चात बचत...

पाचटामधील नत्र ०.४५–०.५०%, स्फुरद ०.१२–०.१५%, पालाश ०.५२–०.६२% असल्याने पिकाला आवश्यक पोषण...

मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव, गांडूळ यांची संख्या वाढते...

जमिनीची भुसभुशीतता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते...


पाचट जाळल्यास अन्नद्रव्ये नष्ट होतात, सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास होतो आणि जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण होतो, असेही नलवडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments