Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूरात आयकर विभागाचे मोठे ‘शर्ट ऑपरेशन’; ७ उद्योगपतींच्या १२ ठिकाणी १७ तासांची धडक तपास...

 


सोलापूर (प्रतिनिधी) – शहरातील अवैध आर्थिक व्यवहार, करचोरी आणि रिअल इस्टेटमधील संशयास्पद गुंतवणुकींवर आयकर विभागाने बुधवारी पहाटे धडाकेबाज कारवाई केली. सूर्योदयाआधीच शहरातील सात प्रतिष्ठित उद्योगपतींच्या घरांवर, दुकानांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या. तब्बल १७ तास चाललेल्या या चौकशीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, गोपनीय हिशोबाच्या डायऱ्या आणि बिननोंदणी व्यवहारांची माहिती जप्त करण्यात आली.



३५ गाड्यांतून ९० अधिकाऱ्यांचा प्रवेश:

माहितीनुसार कोल्हापूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील सुमारे ९० अधिकारी मंगळवारी रात्री विजयपूर येथे मुक्कामाला होते. पहाटे ३ वाजता तीर्थयात्रेचे स्टिकर्स लावलेल्या ३५ वाहनांतून पथक सोलापुराकडे रवाना झाले आणि सकाळी ६ वाजता शहरातील १२ ठिकाणी एकाचवेळी धाड टाकण्यात आली. या कारवाईसाठी शहर पोलिस दलातील २५ जवानांनी सुरक्षा पुरवली.


प्रवेशबंदी; संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंग:

धाडी दरम्यान संबंधित घरे, दुकाने आणि कार्यालयांमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश नव्हता. अधिकाऱ्यांनी आठ वर्षांतील व्यवहारांची तपासणी करून गोपनीय कागदपत्रे जप्त केली. दोन व्यापाऱ्यांनी सीएला बोलावले असले तरी अधिकाऱ्यांनी त्यांना घराबाहेरच थांबवले. मिळालेल्या माहितीवरून गुरुवारीही तपास सुरू राहण्याची शक्यता आहे.




कोणत्या उद्योगपतींवर कारवाई?

ही कारवाई मुख्यतः पुढील व्यापाऱ्यांच्या आस्थापनांवर झाली-

गणेश आपटे (सराफ बाजार) व त्यांचे भागीदार वेणेगुरकर, कोळी...

मनोज शहा (हेरिटेज)...

समीर गांधी (किमया कन्स्ट्रक्शन)...

नारायण पेठकर...

ॲड.. उमेश मराठे...


आपटे समूह रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय असल्याने त्यांच्या मागील सात-आठ वर्षांच्या व्यवहारांचा विशेष तपास करण्यात आला.


विवाहसोहळ्यात धाड; कुटुंबीयांमध्ये तणाव:

किमया कन्स्ट्रक्शनचे समीर गांधी यांच्या घरी रविवारी विवाहसोहळा असून अचानक झालेल्या धाडीमुळे कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला.


अधिकाऱ्यांची गोपनीय हालचाल:

धाडीतील गोपनीयता राखण्यासाठी अधिकाऱ्यांचे जेवण, सुविधा आणि वाहनांचीही अदलाबदल करण्यात आली. दुपारी राइस-प्लेट आणि रात्री साधे जेवण खासगी वाहनांतून पुरवण्यात आले.


करचोरी रिअल इस्टेट आणि सोन्या-चांदीतून?

उच्चस्तरीय सूत्रांच्या माहितीनुसार, काही व्यापारी समोर दिसणाऱ्या मुख्य व्यवसायाच्या आडून रिअल इस्टेट, सोने-चांदी व्यापार आणि दागिन्यांद्वारे काळा पैसा फिरवत आहेत, याच गोपनीय माहितीच्या आधारे हे शर्ट ऑपरेशन राबवण्यात आले.


व्यापारी वर्गात खळबळ; आणखी धाडींची शक्यता:

या कारवाईनंतर सोलापूरातील सराफ बाजार आणि व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. जप्त कागदपत्रांचा तपशील मोठा असल्याचे समजत असून अजून काही ठिकाणी धाडी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments