दक्षिण सोलापूर प्रतिनिधी: तालुक्यात रविवारी संभाजी आरमारतर्फे भव्य शक्तीप्रदर्शन झाले. होटगी स्टेशन, हिपळे, आहेरवाडी, तिल्हेहाळ आणि बोरूळ या गावांमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या जल्लोषात संभाजी आरमारच्या नव्या शाखांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारधारेवर आधारित कार्य करण्याचा संभाजी आरमारला 17 वर्षांचा वारसा आहे. समाजहित, युवक सक्षमीकरण आणि व्यसनमुक्तीचा संकल्प घेऊन संभाजी आरमारने ग्रामीण भागात भक्कम पाय रोवले आहेत.
आरमारचे शेकडो मावळे शिवराज्याच्या हितासाठी कार्यरत असून त्यांच्या या निष्ठेचा आणि कार्यतत्परतेचा परिणाम म्हणून आज संघटना वेगाने विस्तारत आहे.
नव्या शाखांच्या उद्घाटनामुळे शेकडो नव्या कार्यकर्त्यांचा सहभाग मिळत असून या युवा शक्तीचा उपयोग जनहितासाठी, युवकांना सक्षम करण्यासाठी आणि शिव विचार बुलंद करण्यासाठी होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी “जय शिवराय” आणि “हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.






0 Comments