Advertisement

Breaking News
Loading...

कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांचा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद; २५ हजार सरपंचांमध्ये पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची मिळाली अनोखी संधी...!

 


दक्षिण सोलापूर प्रतिनिधी : भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “सरपंच संवाद” या राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेत कासेगावचे लोकनियुक्त सरपंच श्री. यशपाल श्रीकांत वाडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संवाद साधला. कार्यशाळेत राज्यभरातून तब्बल २५ हजार सरपंच सहभागी झाले होते. त्यापैकी केवळ ७–८ सरपंचांना आपल्या गावातील विकासकार्यांचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली. पुणे विभागातून ही संधी मिळणारे एकमेव प्रतिनिधी ठरले – कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर.



सरपंच वाडकर यांनी संवादादरम्यान कासेगाव ग्रामपंचायतीची विकासयात्रा आणि यशोगाथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. त्यांनी विशेषतः खालील मुद्द्यांवर माहिती दिली:

GPDP अंतर्गत CSR निधीचा उपयोग करून जलसंधारण, कृषी, शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रांत झालेले प्रगतीशील काम

सरपंच संवाद उपक्रमाचे परिणामकारक प्रयत्न आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेले नवकल्पनापूर्ण प्रयोग

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानातील उपक्रमांची अंमलबजावणी...



महिला ग्रामसभेत ठराव करून गावातील दारूबंदीचा यशस्वी निर्णय, ज्यासाठी मा. गृहराज्यमंत्री श्री. योगेशजी कदम यांचे सहकार्य विशेष लाभले

सरपंच वाडकर यांच्या सादरीकरणाचे आणि नेतृत्वाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुकपूर्वक उल्लेख केला.

यानंतर सरपंच वाडकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने कासेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे मुख्यमंत्री महोदयांना निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिल्याने कासेगाव तसेच बोरामणी जिल्हा परिषद गटात आनंदाची आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.




या ऑनलाईन कार्यशाळेस सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सूर्यकांत भुजबळ यांच्यासह सरपंच यशपाल वाडकर उपस्थित होते. तर वर्षा निवासस्थानी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार व MITRA चे CEO प्रवीणसिंह परदेशी, QCI अधिकारी जिग्नेश शाह, दिलीपसिंह बैस, श्रीकर परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते.

ही घटना कासेगावचे नाव संपूर्ण राज्यात उज्ज्वल करणारी ठरली असून गावाच्या विकासासाठीच्या प्रयत्नांना मिळालेली ही दाद ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद आहे.

Post a Comment

0 Comments