सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. क्रुजर जीपचा टायर अचानक फुटल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील काही नागरिक देवदर्शनासाठी नळदुर्गकडे निघाले होते. दरम्यान, धाराशिव तालुक्यातील अणदूर परिसरात जीपचा टायर फुटल्यानंतर वाहन ट्रॅक्टरला धडकले आणि रस्त्याच्या कडेला पलटी झाले. धडक इतकी प्रचंड होती की जीपचा पुढील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला.
या अपघातात मृत्यू पावलेल्या पाच जणांपैकी तीन महिला आहेत. जीप पलटी झाल्याने काही प्रवासी वाहनाखाली दबल्याचे सांगितले जाते. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी पोहोचून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढून सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केले. काही जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार क्रुजर जीपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आले होते. मृत आणि जखमी सर्वजण दक्षिण तालुक्यातील उळे परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.




0 Comments