Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर आयकॉन पुरस्कार सोहळ्यासाठी ममता सिंधुताई सपकाळ मंगळवारी 25 नोव्हेंबरला सोलापुरात...

 


सोलापूर | प्रतिनिधी: 


सोलापूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासाठी आदर्श निर्माण करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी ‘सोलापूर आयकॉन पुरस्कार सोहळा व पुस्तक प्रकाशन’ हा भव्य कार्यक्रम मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर येथे मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. समाजासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव व्हावा आणि सोलापूरचा कर्तृत्वाचा ठसा राज्यभर उमटावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.


या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ‘सोलापूर आयकॉन’ या पुस्तकाचे प्रकाशन. या पुस्तकामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, उद्योजकता, शेती, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रांत प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींची जीवनयात्रा, संघर्ष आणि योगदानाचे प्रभावी वर्णन समाविष्ट आहे. जिल्ह्यातील मान्यवरांच्या उज्ज्वल कार्याची नोंद इतिहासात रहावी, या उद्देशाने पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.



या ऐतिहासिक सोहळ्याला विशेष महत्त्व लाभले आहे कारण अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांची कन्या आणि ममता फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. ममता सिंधुताई सपकाळ या मुख्य पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, प्रा. तेजस्विनी कदम, उद्योजक संग्रामभैया भालके, सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष कविता घोडके, सिने अभिनेत्री शितल ढेकळे, सिने अभिनेत्री शिवानी यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील निवडक व्यक्तींना सोलापूर आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्यांच्या समाजहिताच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे. युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या सन्मानामुळे समाजात सकारात्मक बदलांची दिशा निर्माण होईल, असा विश्वास आयोजक व्यक्त करत आहेत.


सोलापूरकरांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments