Advertisement

Breaking News
Loading...

निंबर्गी गणातून श्रुती गायगवळी पंचायत समिती निवडणूक लढवणार: “यंदा आपला विजय निश्चित...!”

 

दक्षिण सोलापूर प्रतिनिधी: "निंबर्गी पंचायत समिती गण हे माझ्यासाठी हक्काचे माहेरघर असून या गणातूनच मी निवडणूक लढवणार आणि निश्चितच विजय मिळवणार", असा ठाम निर्धार श्रुती चंद्रशेखर गायगवळी यांनी हॅलो रिपोर्टर न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे.


सन २०१७ च्या पंचायत समिती निवडणुकीत निंबर्गी गणातून त्यांच्या पती चंद्रशेखर बसवराज गायगवळी यांनी बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर उमेदवारी दिली होती. त्या वेळी त्यांनी एकाकी झुंज देत तब्बल १७५२ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली होती. ही मतसंख्या म्हणजे जनतेचा सार्थ विश्वासाचा पुरावा होता. अपक्ष उमेदवार नागनाथ दुपारगुडे यांनी माघार घेतली असती तर चंद्रशेखर गायगवळी विजयी झाले असते. आजही मतदार त्यांच्या कार्याची आठवण काढतात आणि सहानुभूती व्यक्त करतात.


चंद्रशेखर गायगवळी यांनी पराभवानंतर खचून न जाता सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम केले. रस्ते, रेशन, आरक्षण, अन्याय-अत्याचार, अशा अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये त्यांनी जनतेच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. त्यामुळे आज त्यांच्या कार्याचा ठसा लोकांच्या मनावर उमटलेला आहे.


दरम्यान, सध्याची पंचायत समिती निवडणूक अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने निंबर्गी गणातील नागरिकांनीच श्रुती गायगवळी यांनी उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. "गेल्या वेळेस ज्या चुका झाल्या, त्या पुन्हा होणार नाहीत. यंदा आपला विजय निश्चित आहे," असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.


श्रुती गायगवळी म्हणाल्या, “मी फक्त नावापुरती उमेदवार नाही. पंचायत समितीच्या योजना, घरकुल, मनरेगा, समाजकल्याण, महिला-बालविकास अशा सर्व क्षेत्रात सक्रिय राहून जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याचा माझा संकल्प आहे. महिलांना सह्या करण्यापुरते मर्यादित मानले जाते, पण मी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारी महिला आहे.”


जनतेच्या विश्वासाचा वारसा घेऊन श्रुती गायगवळी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. एक सुशिक्षित, कर्तबगार आणि जनसंपर्क असलेली उमेदवार म्हणून त्यांच्याकडे मतदार आशेने पाहत आहेत. “विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्व जनतेने मला आपली बहिण, मुलगी समजून साथ द्यावी,” असे आवाहन श्रुती गायगवळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments