Advertisement

Breaking News
Loading...

चेन स्नॅचिंग प्रकरणात विजापूर नाका पोलिसांची मोठी कामगिरी; चाकूने हल्ला करून लूट करणारे तीन सराईत गुन्हेगार जेरबंद...

 

सोलापूर प्रतिनिधी : विजापूर रोडवरील आदित्य हॉटेलजवळ थांबलेल्या जोडप्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करून सोन्याची चैन लुटणाऱ्या टोळीचा विजापूर नाका पोलिसांनी छडा लावत अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला. डी.बी. पथकाने तीन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून ₹1.47 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. फिर्यादीच्या निवेदनानुसार, तिघा अज्ञात इसमांनी चाकूचे वार करीत जोडप्याला गंभीर जखमी करून सोन्याची चैन हिसकावून पलायन केले होते.



तपासादरम्यान पोलिसांनी फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून रेखाचित्रे तयार केली आणि गुन्हेगारी अभिलेख तपासले. यामध्ये विकी दशरथ गायकवाड (२५, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ६, सोलापूर) हा मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. डी.बी. पथकाने बाळे ब्रिज परिसरातून त्याला अटक केली. चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.


यानुसार, पोलिसांनी त्याचे सहकारी विनोद ऊर्फ रावण शवरप्पा गायकवाड (२५, रा. होटगी) आणि जगदीश ऊर्फ बारक्या संगटे यांनाही अटक केली. तिघांकडून लुटलेली सोन्याची चैन, चाकू आणि मोटारसायकल असा एकूण ₹1.47 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(६), ३११, ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट ४/२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, निरीक्षक सुशांत वराळे, सपोनि शितलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली.


धाडसी तपास व जलद कारवाईबद्दल नागरिकांनी विजापूर नाका पोलिसांचे कौतुक केले असून परिसरात पुन्हा विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments