Advertisement

Breaking News
Loading...

स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची उल्लेखनीय कामगिरी: 14 गुन्हे उघडकीस; ₹ 21.90 लाखांचा मुद्देमाल जप्त... एस.टी. बसस्थानक चोरी व सोनसाखळी स्नॅचिंग प्रकरणांचा पर्दाफाश...

 


सोलापूर ग्रामीण (हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी): सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एस.टी. बसस्थानक परिसरात होणाऱ्या जबरी चोरी, सोनसाखळी स्नॅचिंग व गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत टोळ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत जबरी चोरी 01, चैन स्नॅचिंग 04 व बसस्थानकातील चोरीचे 09 असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणत 21 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांची बैठक घेऊन जिल्ह्यात वाढत असलेल्या अशा गुन्ह्यांचे विश्लेषण करून तातडीने उकल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.


एस.टी. बसस्थानक चोरी प्रकरण:

पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. पोकॉ प्रमोद शिंपाळे यांनी फुटेजचे सखोल विश्लेषण करून आरोपी निष्पन्न केले, तर पोहेकॉ सलीम बागवान यांनी एस.टी. स्टॅन्ड परिसरातील गुन्ह्यांची माहिती संकलित केली.


गोपनीय बातमीच्या आधारे अक्कलकोट येथे किरण आजिनाथ गायकवाड व राम पांडूरंग दुधाळ (रा. जि. बीड) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कौशल्यपूर्ण तपासात त्यांनी वैराग, अक्कलकोट एस.टी. स्टॅन्ड व अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन परिसरात 08 एस.टी. बसस्थानक चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गु.र.नं. 283/2025 बीएनएस 303(2), 3(5) अन्वये अटक करण्यात आली.

त्याचप्रमाणे टेंभूर्णी एस.टी. स्टॅन्ड परिसरातून दत्ता उर्फ सोन्या विजय गायकवाड, शाम साहेबराव उबाळे व बाळासाहेब प्रकाश गायकवाड (रा. जि. बीड) या तीन आरोपींना अटक करून 01 एस.टी. स्टॅन्ड चोरीचा गुन्हा उघड करण्यात आला.

या कारवाईत 110 ग्रॅम वजनाचे सुमारे 14.30 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली एर्टिका कार (MH-04-FR-3833) किमत 5 लाख रुपये असा एकूण 19.30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


सोनसाखळी स्नॅचिंग प्रकरण:

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने अकलुज उपविभागातील माळशिरस येथे सापळा रचून दुर्योधन उर्फ बबलू कांतीलाल चोरमले (रा. गोंदी, ता. इंदापूर, जि. पुणे) याला अटक केली. तपासात त्याने साथीदार गुणाल जाधव व रोहन नेताजी बाबर यांच्यासह 01 जबरी चोरी व 04 सोनसाखळी स्नॅचिंग असे एकूण 05 गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 20 ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे 2.60 लाख रुपये) हस्तगत करण्यात आले.


कामगिरी बजावलेले अधिकारी व अंमलदार:

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या मोहिमेत सपोनि नागनाथ खुणे, सपोनि विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड, सफौ नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, पोहेकॉ सलीम बागवान, मोहन मनसावाले, रवि माने, धनराज गायकवाड, दिपाली जावध, अश्विनी गोटे, पोकॉ प्रमोद शिंपाळे, सागर ढोरे-पाटील, विनायक घोरपडे, सूरज रामगुडे, मनोज राठोड, अन्वर अत्तार, बाळराजे घाडगे, योगेश जाधव, अक्षय डोंगरे, संदीप हुलगे, मपोकॉ सुनंदा झळके यांचा सहभाग होता.

तसेच टेंभूर्णी पोलीस ठाण्याचे सोमनाथ गायकवाड, केसर झोळ, नितीन तळेकर, अकलुज पोलीस ठाण्याचे डील पोहेकॉ सुहास क्षीरसागर व पोहेकॉ विशाल पोरे, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ व्यंकटेश मोरे यांनी सहकार्य केले.


या यशस्वी कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील एस.टी. प्रवासी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments