Advertisement

Breaking News
Loading...

झेडपी–पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल; २१ दिवसांत प्रक्रिया पूर्ण, सोलापूरसह १२ झेडपींचा समावेश...

 


सोलापूर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून सोलापूरसह १२ जिल्हा परिषदांमधील व १२५ पंचायत समित्यांमधील निवडणूक प्रक्रिया अवघ्या २१ दिवसांत पूर्ण करण्याची तयारी करण्यात आली आहे. ८ जानेवारीपूर्वी आचारसंहिता लागू होऊ शकते, अशी माहिती आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.


राज्यातील ३२ जिल्हा परिषदांपैकी १२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा पाळली गेल्याने याच जिल्ह्यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. उर्वरित २० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्याने सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक स्थगित केली आहे.



या १२ जिल्हा परिषदांचा समावेश:

सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर.

आयोगाकडून ८ ते १० जानेवारी दरम्यान निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २१ जानेवारी रोजी सुनावणी होणार असून, त्यानंतर उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकां -बाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश:

मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार नगरपरिषदा व नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून, महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षण अडचणीमुळे काही निवडणुका ३१ जानेवारीनंतरच होतील. दरम्यान, जानेवारी–फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या पाच हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्याही निवडणुका घेण्यात येणार आहेत.


संभाव्य निवडणूक कार्यक्रम:

उमेदवारी अर्ज भरणे : १० ते १७ जानेवारी

अर्जांची छाननी व माघार : १८ ते २० जानेवारी

चिन्ह वाटप : २१ जानेवारी

मतदान : ३० जानेवारी

मतमोजणी : ३१ जानेवारी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वच राजकीय पक्षांचे आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments