Advertisement

Breaking News
Loading...

नांदणी आरटीओ चेक पोस्टवर एसीबीची कारवाई; सोलापूरचे दोन अधिकारी लाचप्रकरणी अटकेत...

 


नांदणी / दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी आरटीओ चेक पोस्टवर अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) यांनी मोठी कारवाई करत लाचखोरीप्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. जालना येथील एसीबी पथकाने अचानक धाड टाकून ही कारवाई केल्याने परिवहन व प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नांदणी आरटीओ चेक पोस्टवर कार्यरत असलेल्या या दोन अधिकाऱ्यांविरोधात वाहनचालकांकडून बेकायदेशीर लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे दाखल झाली होती. तक्रारीची शहानिशा करून जालना एसीबी पथकाने सापळा रचत ही कारवाई केली.


धाडीदरम्यान संबंधित ठिकाणी आवश्यक कागदपत्रे, रोकड व इतर पुरावे तपासण्यात आले असून, लाचखोरीचे ठोस पुरावे हाती लागल्याचे समजते. या कारवाईमुळे नांदणी चेक पोस्टवरील कथित गैरप्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.


वाहनचालकांकडून नियमितपणे होणाऱ्या बेकायदेशीर वसुलीबाबत यापूर्वीही तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर एसीबीकडून सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी अधिकारी किंवा कर्मचारी गुंतले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील कायदेशीर कारवाई एसीबीमार्फत सुरू आहे. या घटनेमुळे नांदणी आरटीओ चेक पोस्टवरील कारभाराच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Post a Comment

0 Comments