सोलापूर ग्रामीण / हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायावर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव तांडा येथे 03 अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत 14,600 लिटर गुळमिश्रित रसायन व साहित्य असा सुमारे 6,18,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित प्रकरणी 03 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी यांनी निवडणूक कालावधीत अवैध दारू निर्मिती व वाहतूक रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली 4 विशेष पथके तयार करून आज दिनांक 25/12/2025 रोजी मुळेगांव तांडा परिसरात छापे टाकण्यात आले.
या छाप्यांदरम्यान हातभट्टी दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले 73 बॅरेलमधील 14,600 लिटर गुळमिश्रित रसायन आढळून आले. सदर रसायन साठा जागीच नष्ट करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
निवडणूक कालावधीत अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असून, वारंवार गुन्हे करणाऱ्या इसमांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत सपोनि विशाल वायकर, नागनाथ खुणे, विजय शिंदे, भिमगोंडा पाटील यांच्यासह एकूण 24 पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी होते.





0 Comments