Advertisement

Breaking News
Loading...

नांदणी आरटीओ चेक पोस्टवर भ्रष्टाचार उघड; एसीबीने ‘या’ अधिकाऱ्यासह एजंटला पकडले...

 


नांदणी / दक्षिण सोलापूर प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील नांदणी (जि. सोलापूर) आरटीओ चेक पोस्टवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत मोटार वाहन निरीक्षक आणि त्याच्या खासगी एजंटला रंगेहाथ पकडले. जालना येथील एसीबी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.


या प्रकरणात तानाजी शिवाजी धुमाळ (वय ४९), मोटार वाहन निरीक्षक (वर्ग–१), नेमणूक प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड (सध्या नांदणी चेक पोस्ट) आणि अमोल आप्पासाहेब पाटील (वय ५०), रा. सोलापूर (खासगी इसम) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.


तक्रारदार ३९ वर्षीय मालवाहू ट्रेलर चालक असून ते नियमितपणे गुजरात ते चेन्नई या मार्गावर मालवाहतूक करतात. नांदणी चेक पोस्टवर ट्रेलर पास करून देण्यासाठी प्रत्येक वेळी २,००० रुपये लाच द्यावी लागत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी लाच देण्यास नकार देत त्यांनी ही बाब जालना एसीबीकडे कळवली.


दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत तक्रारदार पंचासह आरोपी तानाजी धुमाळ यांच्या कक्षात गेला असता, त्यांच्या समोर बसलेल्या खासगी इसम अमोल पाटील याने गाडी पास करण्यासाठी ३,००० रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर २,५०० रुपये स्वीकारण्याचे ठरले असून याला मोटार वाहन निरीक्षकाने मूकसंमती दिल्याचे निष्पन्न झाले.


यानंतर एसीबीने पंचासमक्ष सापळा रचला. तक्रारदाराकडून २,५०० रुपये लाच स्वीकारून ती रक्कम मोटार वाहन निरीक्षकाच्या समोरील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवताच एसीबी पथकाने दोन्ही आरोपींना रोकडेसह ताब्यात घेतले.


कारवाईदरम्यान मोटार वाहन निरीक्षकाकडून ॲपल मोबाईल, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ; तर खासगी इसमाकडून सॅमसंग मोबाईल, ११,८१० रुपये रोख, सोन्याच्या दोन अंगठ्या व साखळी जप्त करण्यात आली. तसेच ड्रॉवरमध्ये लाचेची रक्कम २,५०० रुपये व अन्य २४,३९० रुपये असा मुद्देमाल आढळून आला.


या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाणे, जि. सोलापूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७, ७(अ) व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंद झाल्यानंतर अटक केली जाणार आहे. मोटार वाहन निरीक्षकाच्या घरझडतीची कार्यवाहीही सुरू आहे.


ही संपूर्ण कारवाई सापळा अधिकारी बाळू संपत्ती जाधवर (पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जालना) व तपास अधिकारी प्रशांत रामचंद्र चौगुले (पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. सोलापूर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकाने ही यशस्वी कारवाई केली.


Post a Comment

0 Comments