निंबर्गी|दक्षिण सोलापूर प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : समाजकारणातून राजकारणात ठसा उमटविणाऱ्या, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा ठोस वारसा जपणाऱ्या सौ. सुषमा नागनाथ दुपारगुडे (M.Sc. B.Ed. DSM) या निंबर्गी गणातून अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातून भारतीय जनता पक्षाकडून पंचायत समिती निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सौ. सुषमा दुपारगुडे या गेल्या अनेक वर्षांपासून महिला बचत गट, स्वयंरोजगार पतसंस्था, महिला सक्षमीकरण, निराधार योजना, आरोग्य शिबिरे, मोतीबिंदू शिबिरे, आधार कार्ड शिबिरे, वृक्षारोपण, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम अशा विविध सामाजिक कार्यांत सक्रियपणे कार्यरत आहेत. कार्यकर्ता मेळावे घेऊन तळागाळातील महिलांना संघटित करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविला असून, भंडारकवठे येथील जीवन विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७ वर्षे, औराद येथील यशवंत विद्यालयात ५ वर्षे, विंचूर येथील पंचाक्षरी विद्यामंदिरात २ वर्षे, तर मंद्रुप येथील महात्मा फुले विद्यालयात १ वर्ष अध्यापनाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याचा त्यांचा प्रयत्न अनेक पालक व विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी ठरला आहे.
राजकीय पार्श्वभूमीही त्यांना लाभलेली आहे. त्यांचे पती ॲड. प्रा. नागनाथ गणपती दुपारगुडे यांनी २०१२ ग्रामपंचायत, २०१७ पंचायत समिती निवडणूक स्वबळावर, तर २०१९ विधानसभा निवडणूक बहुजन समाज पक्षाकडून लढविली होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया, संघटन आणि लोकसंपर्काचा अनुभव कुटुंबीय पातळीवरच त्यांना मिळालेला आहे.
अनुसूचित जाती बौद्ध समाजातून येणाऱ्या सौ. दुपारगुडे या समाजाच्या प्रश्नांबाबत नेहमीच संवेदनशील राहिल्या असून, “राजकारण हे समाजकारणाचे प्रभावी साधन आहे” या भूमिकेतून त्या पुढे येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, भाजपची विकासात्मक धोरणे आणि सबलीकरणाचा अजेंडा यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
निंबर्गी गणातील महिला, शिक्षक वर्ग, बचत गट, तरुण कार्यकर्ते आणि अनुसूचित जाती समाजात त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, “शिक्षण, अनुभव आणि सामाजिक कामाची सांगड घालणारी सक्षम महिला उमेदवार” अशी ओळख त्या तयार करत आहेत.
जर भाजपकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली, तर निंबर्गी गणातील पंचायत समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता असून, राजकीय समीकरणे बदलण्याची ताकद त्यांच्या उमेदवारीत असल्याचे बोलले जात आहे.


0 Comments